तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी ईदच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर, काश्मीर विरोधात गरळ ओकली आहे. खोमेनी यांनी नमाज पठणा दरम्यान ग्लोबल इस्लामिक कम्युनिटीला काश्मीर, येमेन आणि बहारीनमधील निर्दोषांवरील होणारे हल्ले आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे.


AhlulBayt वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, इराणची राजधानी तेहरानमधील ग्रेट मुसल्ला मैदानावरील नमाज पठणानंतर अयातुल्ला खोमेनी यांनी इराणच्या नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी, ''काश्मीरसारख्या मुद्द्यावर मुस्लीम समाजातील बुद्धीजीवी वर्गानं आपला दृष्टीकोन स्पष्ट करावा,'' असं आवाहन केलं.

खोमेनी यांनी पहिल्यांदाच काश्मीरप्रश्नी मत व्यक्त केलं असून, त्यांचं हे मत वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, त्यांनी अशावेळी काश्मीर विरोधात गरळ ओकली आहे, जेव्हा काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळून आला होता.

खोमेनींनी काश्मीरप्रश्नी दोन ट्वीटही केले आहेत. यात त्यांनी काश्मीर प्रश्नी मत व्यक्त करताना मुस्लिम समाजाला आवाहन केलं आहे. खोमेनी यांच्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, ''मुस्लिम समाजाने बहारीन, काश्मीर, येमेन आदी प्रश्नांवर जाहीर मतप्रदर्शन केलं पाहिजे. रमजानच्या काळात नागरिकांवर होणारे हल्ले आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे,''असं म्हटलं आहे.


खोमेनीच्या दुसऱ्या ट्वीटमध्येही अशाच प्रकारचं आवाहन करण्यात आलं आहे. खोमींनीच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये ''बहारीन, येमेन आणि इतर मुस्लीम देशांत होणाऱ्या हिंसाचारात इस्लामच्या शरिराला जखमा करत आहेत,'' अशी चिथवणी देणारी भाषा वापरली आहे.



दरम्यान,  सतत धुमसणारं जम्मू-काश्मीरचं खोरं फुटीरतवाद्यांच्या उपद्रवानं काल ईदच्या दिवशीही धुमसत होतं. श्रीनगरमधल्या ईदगाह, पुलवामा आणि अनंतनागमध्ये सैन्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळी काश्मीरचे तरुण पाकिस्तानचे झेंडे हातात घेऊन सैन्यावर दगडफेक करत होते.

त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी सैन्याकडून अश्रुधूरही सोडण्यात आली. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्यास उशीर लागला. पण या दगडफेकीत सैन्य दलासह अनेक नागरिक जखमी झाले होते.

दुसरीकडे गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी इराणमधलं चाबहार बंदरासह अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीच मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे, यावेळी मोदींनी अयातुल्ला खोमेनी यांचीही भेट घेतली होती. यावेळी खोमेनी यांनी भारत-इराण संबंध अधिक मजबूत होण्यासाठी इराण प्रयत्नशील असेल, असं सांगितलं होतं.

संबंधित बातम्या

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे दाखवत जवानांवर दगडफेक