Continues below advertisement

मुंबई : जगात असे अनेक देश आहेत जिथली न्यायव्यवस्था अत्यंत कठोर आहे, कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगाराला माफी नाहीच. असाच एक देश आहे इराण. याच इराणमध्ये (Iran) गेल्या दहा महिन्यात तब्बल एक हजार पेक्षा जास्त जणांना फासावर लटकवल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पण यामागची नेमकी कारणं काय? कोणत्या गुन्ह्यासाठी या हजारो जणांना फासावर लटकवण्यात आलंय? पाहूयात याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...

इराण हा जगातला एक कट्टर इस्लामिक देश. इथे लोकशाही नावालाच आहे... इथे चालते हुकूमशहांची सत्ता. म्हणूनच सरकारच्या विरोधात जाणाऱ्याला, धर्मविरोधी कारवाई करणाऱ्याला इराणमध्ये एकच शिक्षा आणि ते म्हणजे मृत्यूदंड.

Continues below advertisement

इराणमध्ये फाशीची शिक्षा सामान्य आहे. पण 2025 मध्ये इराणमधली परिस्थिती अधिक भयंकर बनली. मानवाधिकार संघटनांच्या एका आकडेवारीनुसार, या वर्षात इराणमध्ये तब्बल एक हजार पेक्षा जास्त जणांना फासावर लटकवण्यात आलं आहे.

Iran News : इराणमध्ये फाशीचं सत्र

जानेवारी 87

फेब्रुवारी 74

मार्च 59

एप्रिल 110

मे 152

जून 98

जुलै 110

ऑगस्ट 142

सप्टेंबर 171

ऑक्टोबर - 217

महत्त्वाचं म्हणजे इस्रायलविरुद्धच्या संघर्षानंतर इराणमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचं प्रमाण कमालीचं वाढल्याचं दिसून येतंय. हेरगिरी, देशविघातक कारवाया, सरकारविरोधी आंदोलन पुकारणं, धर्माच्या विरोधात जाणं, अमली पदार्थाची तस्करी अशा अनेक गुन्ह्याखाली इराणी सरकारनं शेकडो जणांना थेट फासावरच लटकवलं आहे.

पण भारता शेवटचं फासावर कधी लटकवलं गेलं होतं तुम्हाला माहीत आहे का? 20 मार्च 2020 साली दिल्लीतील निर्भया हत्याकांडातील चार आरोपींना फाशी देण्यात आली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षात भारतात एकाही गुन्हेगाराला फाशी देण्यात आलेली नाही.

खरंतर, स्वतंत्र भारतात आतापर्यंत किती जणांना फाशी दिली याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. पण हा आकडा साधारण सातशेच्या आसपास आहे. पण इराणमध्ये याच वर्षात जल्लादानं हजार पेक्षा जास्त वेळा फाशीचा खटका ओढला.

इराणी कायदे हे भारतासारखे पारदर्शक नाहीत. इराणमध्ये फाशीची शिक्षा ही सरकार आपली पकड कायम ठेवण्यासाठी वापरत असलेली दडपशाहीची प्रतिकात्मक यंत्रणा आहे. राजकीय विरोध दडपण्यासाठी वापरलं जाणारं हे हत्यार आहे. इथे जनतेला हेच दाखवण्याचा प्रयत्न असतो, 'आमच्या विरोधात गेलात तर शेवट फार वाईट होईल!' 

ही बातमी वाचा: