मुंबई: नोटाबंदी, जीएसटी यामुळे भारतीयांचं गुंतवणुकीचं प्रमाण कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय दिवाळीसारख्या सणात दरवर्षीप्रमाणे होणारी दुचाकी, चारचाकी किंवा गॅझेट्सची म्हणावी तीतकी विक्री झाली नाही.
एकीकडे हे चित्र असताना, दुसरीकडे दुबईतून नवी आकडेवारी समोर आली आहे. दुबईत सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश म्हणून भारत पहिल्या क्रमांकावर आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतातील मुंबई, नवी मुंबई, पुणे या शहरांतील नागरिकांनी गुंतवणुकीसाठी दुबईला पसंती दिल्याचं समोर आलं आहे.
42 हजार कोटींची गुंतवणूक
भारतीयांनी जानेवारी 2016 ते जून 2017 यादरम्यान दुबईत थोडी थोडकी नाही तर तब्बल 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
दुबईत जमीन/भू विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
भारतीयांनी 2014 मध्ये दुबईत 30 हजार कोटींची गुंतवणूक केली होती. मात्र यंदा त्यामध्ये 12 हजार कोटींची वाढ होऊन, ती 42 हजार कोटींवर पोहोचली.
“दुबईत रिअल इस्टेटमध्ये भारतीयांच्या गुंतवणुकीचा ओढा कायम आहे. यंदाही अन्य देशांच्या तुलनेत भारतीयांनीच सर्वाधिक गुंतवणूक केली आहे”, असं दुबई प्रॉपर्टी शोने म्हटलं आहे.
‘दुबई प्रॉपर्टी शो’ने येत्या 3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे.
‘दुबई प्रॉपर्टी शो’चा सर्व्हे
‘दुबई प्रॉपर्टी शो’ने भारतीयांच्या गुंतवणुकीबाबत सर्व्हे केला आहे. त्यानुसार भारतीय हे दुबईत रिअल इस्टेट अर्थात बांधकाम किंवा घरांमध्ये पैसे गुंतवत आहेत. यामध्ये 88 टक्के मुंबईकर आणि त्याजवळच्या पुणे, नवी मुंबई, अहमदाबाद या शहरातील लोक हे 3.24 ते 6.50 कोटी रुपये घर किंवा बांधकाम व्यवसायात गुंतवू इच्छित आहेत.
8 टक्के लोकांची 65 लाख ते 3.24 कोटी रुपयांपर्यंतचं घर घेण्याला पसंती आहे. तर राहिलेल्या 4 टक्के गुंतवणूकदारांची 6.50 कोटी रुपयांच्या पुढे गुंतवणूक करण्याची तयारी आहे.
याशिवाय 33 टक्के लोक हे अपार्टमेंट किंवा त्यातील घरांना पसंती देतात, तर 17 टक्के लोकांची विला/बंगल्यांना पसंती आहे.