अमेरिकेत एकाच कुटुंबातील चौघा शीख नागरिकांची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 01 May 2019 08:10 AM (IST)
यूएसमधील ओहिओ प्रांतातील सिनसिनाटी शहरात रविवारी तीन महिला आणि एका पुरुषाची हत्या करण्यात आली. गोळी झाडून या चौघांचा जीव घेण्यात आल्याची माहिती आहे.
सिनसिनाटी (यूएसए) : अमेरिकेतील सिनसिनाटी शहरामध्ये चौघा शीख नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. मृतांपैकी तिघे जण भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत, तर एक भारतीय पर्यटक होता. यूएसमधील ओहिओ प्रांतातील सिनसिनाटी शहरात रविवारी तीन महिला आणि एका पुरुषाची हत्या करण्यात आली. गोळी झाडून या चौघांचा जीव घेण्यात आल्याची माहिती आहे. मृतांपैकीच एखादा सर्वांचा मारेकरी असल्याची शक्यता स्थानिक पोलिसांनी नाकारली. चौघे जण जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा फोन एका व्यक्तीने पोलिसांना केला होता. पोलिस घटनास्थळी पोहचले तेव्हा चौघांचे मृतदेह आढळले. 39 वर्षीय शालिंदरजीत कौर, 58 वर्षीय अमरजीत कौर, 62 वर्षीय परमजीत कौर आणि 59 वर्षीय हकिकत सिंग पन्नाग अशी मृतांची ओळख पटवण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी रात्री ट्विटरवरुन या घटनेची माहिती दिली. मात्र हा द्वेषातून घडलेला गुन्हा (हेट क्राईम) असल्याची शक्यता सुषमा यांनी फेटाळून लावली आहे. अमेरिकेतील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलं. स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.