मॉस्को: गेमच्या नावे मुलांना जीव द्यायला भाग पाडणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक झाली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेली आरोपी 17 वर्षाची मुलगी आहे.


रशियन पोलिसांनी तिला बुधवारी बेड्या ठोकल्या. ब्लू व्हेल गेम चॅलेंजमागे तिचाच हात असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

ही मुलगी ब्लू व्हेल गेम खेळणाऱ्यांना टास्क द्यायची. त्यानंतर टास्कच्या नावे आत्महत्येस प्रवृत्त करायची. जर टास्क पूर्ण केला नाही, तर गेम खेळणाऱ्याला त्याच्या परिवाराची हत्या करण्याची धमकी देत असे, असा आरोप तिच्यावर आहे.

जेलमध्ये रवानगी

पोलिसांनी आरोपी तरुणीला तिच्या घरातून अटक केली. आरोपी मुलगी मनोविज्ञानाची विद्यार्थिनी आहे. तिने आपला गुन्हा कबूल केल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. आरोपी मुलीला न्यायालयात हजर केलं असता, तिला तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे ‘ब्ल्यू व्हेल’ गेम?

ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये एक ‘मास्टर’  मिळतो मास्टर प्लेअरला कठीण टास्क देतो. स्वत:च्या रक्ताने ब्ल्यू व्हेल तयार करणं, शरीरावर जखमा करणे, दिवसभर हॉरर फिल्म पाहणे, रात्रभर जागणे अशा प्रकारचे टास्क मिळाल्यामुळं खेळणारे नैराश्याच्या गर्तेत जातात अशा प्रकारे मास्टर प्लेअरवर 50 दिवस कंट्रोल ठेवतो. खेळाचा शेवटचा टप्पा म्हणजे प्लेअरला आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं आणि स्वतःची हिंमत सिद्ध करण्यासाठी अनेक प्लेअर आत्महत्या करतात.

हातावर F57 लिहावं लागतं

गेम खेळणाऱ्याला दररोज एक कोड नंबर दिला जातो. यामध्ये हातावर ब्लेडने F57 लिहावं लागतं. ते लिहून फोटो अपलोड करावा लागतो. या गेमचा अॅडमिन स्काईपवरुन गेम खेळणाऱ्याशी संपर्कात असतो. जो शेवटच्या दिवशी आत्महत्या करतो, त्यालाच विजेता घोषित केलं जातं.

22 वर्षीय मास्टरमाईंडची धक्कादायक माहिती

फिलीप बुडेकिन उर्फ फिलीप लिस (फॉक्स) या 22 वर्षांच्या रशियन तरुणाने हा गेम तयार केला आहे. सोशल मीडियावर तरुणांशी मैत्री केल्यानंतर तो त्यांचा ब्रेनवॉश करतो. या गेमच्या निर्मितीमागील त्याने सांगितलेलं कारण अत्यंत धक्कादायक आहे. पृथ्वीवरील जैविक कचरा (biological waste) स्वच्छ करण्यासाठी हा घाट घातल्याचं तो सांगतो.

मुंबईत 14 वर्षीय तरुणाची आत्महत्या

रशियात शेकडो मुलांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या ब्ल्यू व्हेल गेमने भारतातही शिरकाव केल्याचं पाहायला मिळालं. कारण याच ब्ल्यू व्हेल गेमच्या नादापायी अंधेरीतल्या 14 वर्षाच्या मुलाने आपला जीव गमावला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील ही घटना घडली.

मुंबईच्या अंधेरी परिसरातल्या शेर ए पंजाब कॉलनीमध्ये राहणाऱ्या 14 वर्षाच्या मनप्रीत सहानने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.

मात्र, मनप्रीतच्या कृत्याला आत्महत्या म्हणायचं की हत्या, असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांपासून पोलिसांनाही पडला आहे. कारण ब्ल्यू व्हेल या जीवघेण्या खेळाच्या नावाखाली मनप्रीतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचं समोर आलं होतं.

संबंधित बातम्या

ब्ल्यू व्हेल गेमच्या 22 वर्षीय मास्टरमाईंडची धक्कादायक माहिती

‘ब्लू व्हेल’ गेमच्या नादापायी मुंबईतील 14 वर्षीय मुलाची आत्महत्या

जीवघेण्या ‘ब्लू व्हेल’ गेममुळे 130 मुलांची आत्महत्या?

ब्लू व्हेल गेम विधानसभेत, अजित पवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर