वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये भारतीय इंजिनिअर श्रीनिवासन कुचीभोतला यांची वर्णद्वेशातून हत्या करण्यात आली आहे. कन्सास शहरातल्या ऑस्टिन बार अँड ग्रीलमध्ये ही घटना घडली.
मुळचा हैदराबादचा असलेल्या 32 वर्षीय श्रीनिवासला 'माझ्या देशातून चालता हो' असं ओरडत एका निवृत्त सैनिकाने गोळ्या झाडल्या. अॅडम प्युरिन्टन असं या हल्लेखोराचं नाव असून त्याला मिसूरी राज्यातून अटक करण्यात आली आहे.
या हल्ल्यात श्रीनिवासनचा भारतीय मित्र आलोक मदासानी गंभीर जखमी झाला आहे. तर त्यांचा तिसरा अमेरिकन सहकारी इयान ग्रीलोट या दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात किरकोळ जखमी झाला आहे.
स्थानिक मीडियानुसार वर्णद्वेशातून हा झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. गोळी झाडण्यापूर्वी अॅडम प्युरिन्टन 'माझ्या देशातून निघून जा' असं ओरडला होता.
अमेरिकेतील भारतीयांमध्ये तणाव
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका होत असताना या घटनेमुळे अमेरिकेत खळबळ माजली आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर वर्णद्वेष वाढला आहे. यावेळी भारतीय वंशाचे नागरिक त्याचा बळी ठरत आहेत. या घटनेनंतर अमेरिकेतील भारतीयांमध्ये तणावाचं वातावरण आहे.
परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
दरम्यान अमेरिकेतील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जखमी आलोकची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संपूर्ण घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसंच श्रीनिवासच्या वडील आणि भावाशी बोलून कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. श्रीनिवासचं पार्थिव भारतात आणण्यासाठी संपूर्ण तयारी केल्याचंही स्वराज यांनी सांगितलं.