पाकिस्तानात भारतीय नागरिकाला अटक, पासपोर्ट नसल्याचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 21 May 2017 06:27 PM (IST)
इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय कोर्टाने स्थगिती दिल्याने, भारताला तूर्तास दिलासा मिळाला आहे. तितक्यातच पाकिस्तानमध्ये एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे. परदेशात प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रं (पासपोर्ट आणि व्हिसा) नसल्याच्या आरोपातून या इसमाला अटक झाल्याची माहिती 'एएनआय'ने दिली आहे. कारवाई झालेल्या भारतीय नागरिकाचं नाव उघड करण्यात आलेलं नाही. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील F-8 भागातून त्याला अटक करण्यात आली. परराष्ट्र कायद्याच्या कलम 14 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. भारतीय उच्चायुक्तांना या अटकेविषयी अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही. आंतरराष्ट्रीय कोर्ट (आयसीजे) ने पाकला कुलभूषण जाधवांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यानंतर दोनच दिवसात पाकने आणखी एका भारतीय नागरिकाला अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती मिळाली असली, तरी त्यांची सुटका झालेली नाही. जाधव यांना पाकने इराणमधून अटक केल्याचं भारताने सांगितलं आहे, तर पाकने मात्र बलोचिस्तानात राष्ट्रविरोधी कारवाई करताना त्यांची धरपकड केल्याचा कांगावा केला आहे.