बीजींग : ज्या देशात कोरोनाने थैमान घातलं आणि नंतर ते साऱ्या जगभरात पसरलं, त्याच चीनमध्ये कोरोनामुळे गेल्या 24 तासात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जानेवारी महिन्यात कोरोनाचा कहर सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच असा दिवस उजाडला ज्या दिवशी कोरोनांमुळे एकही मृत्यू झाला नाही.


गेल्या काही दिवसात चीनमधील रुग्णांची आणि मृत्यूची संख्या नियंत्रणात आली आहे. असं असलं तरी बाहेरुन आलेल्या रुग्णांची संख्या हजारवर पोहचली आहे. त्यातले 32 नवे रुग्ण सोमवारी आढळले आहे. हे सर्व इतर देशात अडकून पडलेले चीनी नागरिक आहेत. ज्यांना तिकडून परत आणण्यात आलं आहे. त्यामुळे  दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चीनमध्ये 31 डिसेंबरला पहिल्यांदा कोरोनाग्रस्ताची नोदं झाली होती. त्यानंतर हा आकडा वाढत गेला. सध्या 81 हजार 740 रुग्णांपैकी 77 हजार 167 रुग्ण बरे झाले आहेत. 3 हजार 331 मृत्यूमुखी पडले तर  अजुनही कोरोनाग्रस्त असलेल्यांची संख्या 1240वर आहे.

चीनने कोरोनाचा प्रसार हुबेई प्रांत आणि वुहानपुरताच रोखण्यात यश मिळवलं आहे. त्यांची मोठी शहरं बीजिंग आणि शांघाय कोरोनाच्या कचाट्यातून वाचली आहेत.

VIDEO | जगभरात साडे 13 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त; अमेरिका, स्पेन, इटलीत कोरोनाचा कहर



जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा साडे 13 लाख पार

चीनच्या वुहान शहरातून जगभरातील इतर देशांमध्ये पसरलेला जीवघेणा कोरोना व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात साडे 13 लाखांहून अधिक कोरोना बाधित आहेत. जगभरात आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 74 हजार 697 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सर्वाधिक कोरोना बाधित अमेरिकेत आहेत. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 10 हजार 871 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये आता संसर्ग झालेल्या रूग्णांच्या संख्येत घट आल्याचं पाहायला मिळत आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4400 पार

भारतामध्ये कोरोना व्हायरस दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 4421 वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील त्यापैकी 1445 रूग्ण हे तब्लिगींच्या धार्मिक कार्यक्रमातील असून काही त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या रूग्णांपैकी 76 टक्के पुरूष आणि 24 टक्के महिला आहेत.