नवी दिल्ली : इंग्लंडच्या संसदेबाहेर बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसासह चार जणांचा मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले आहेत. तर हल्लेखोराचाही खात्मा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून भारत इंग्लंडसोबत असल्याचं म्हटलं आहे.


दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत इंग्लंडच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल, असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

हल्लेखोरांनी संसदेबाहेर एका पोलीस अधिकाऱ्याला चाकूनं भोसकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संसदेच्या सुरक्षा रक्षकांनी दोन हल्लेखारांना कंठस्नान घातलं. गोळीबारानंतर संसदेची इमारत बंद करण्यात आली.

लंडन : दहशतवादी हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू, 40 जखमी, हल्लेखोराचाही खात्मा


सध्या ब्रिटनच्या संसदेचं सत्र सुरु आहे. याचवेळी संसदेच्या परिसरात गोळीबार आणि चाकू हल्ल्याची घटना घडली. तर दुसरीकडे त्याचवेळी संसद परिसरातील एका ब्रीजवर एका कारनं तब्बल सहा ते आठ जणानां चिरडलं. या सर्व प्रकारानंतर या परिसरात नाकाबंदी करण्यात आली.

हा सर्व प्रकार सुरु असताना इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यादेखील त्याच परिसरात होत्या. मात्र, त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, पोलीस सध्या या संपूर्ण हल्ल्याचा सखोल तपास करत आहेत.

गेल्या वर्षी याच दिवशी ब्रसेल्समध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर युरोपीय देशांतील अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.