मुंबई : सध्या भारत (India) आणि कॅनडा (Canada) या दोन्ही देशांमध्ये तणाव (India-Canada Diplomatic Row) पाहायला मिळत आहे. खलिस्तानी दहशतादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) च्या हत्येमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान (Prime Minister of Canada) जस्टिन टुड्रो (Justin Trudeau) यांनी खलिस्तानी (Khalistani) दहशतादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केला. यानंतर आता कॅनडाच्या संरक्षण मंत्र्यांनी मात्र, वेगळाच सूर लावला आहे.
कॅनडाच्या संरक्षणमंत्र्यांनी सूर बदलला
कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेयर यांनी म्हटलं की, आमचे (कॅनडा) भारतासोबतचे संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत. कॅनडा इंडो-पॅसिफिक भागीदारीचा पाठपुरावा करत राहील. (India-Canada Relation) कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेयर यांनी रविवारी ग्लोबल न्यूज आयोजित द वेस्ट ब्लॉकवरील एका मुलाखतीत भारतासोबतच्या संबंधांवर वक्तव्य केलं आहे. कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेयर यांनी म्हटलं आहे की, 'आरोपांच्या तपास सुरु असेपर्यंत कॅनडा भारतासोबतची भागीदारी कायम ठेवेल. भारतासोबतचे संबंध महत्वपूर्ण आहेत.'
''...तर ही कॅनडासाठी अत्यंत चिंतेची बाब"
"कायद्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. आमच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सखोल तपास करून सत्यापर्यंत पोहोचू शकू याची आम्हाला खात्री आहे. आरोप खरे ठरल्यास, कॅनडाच्या भूमीवर कॅनेडियन नागरिकाची हत्या करणे हे आमच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन ठरेल, तर ही कॅनडासाठी अत्यंत चिंतेची बाब ठरेल", असं कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेयर यांनी म्हटल्याचं ग्लोबल न्यूजने सांगितलं आहे.
'मिळालेल्या गुप्तचर माहितीमुळे चिंतेत'
कॅनडाचे संरक्षण मंत्री ब्लेअर म्हणाले की, आम्हाला मिळालेले पुरावे आणि आम्हाला मिळालेल्या विश्वसनीय गुप्तचर माहितीमुळे आम्ही खूप चिंतेत आहोत. एक माजी पोलीस अधिकारी आणि नक्कीच एक संसद सदस्य म्हणून मी खूप चिंतेत आहे. या प्रकरणाच्या तपासाबाबत आम्ही चिंतेत आहोत. सध्या आरसीएमपीकडून सुरू असलेल्या तपासात मोठी खबरदारी घेतली जात आहे. आम्ही या तपासात अत्यंत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत..
कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारतावर आरोप
याआधी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला. अगदी भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. दरम्यान, कॅनडाने केलेले सर्व आरोप भारताने फेटाळून लावत कॅनडाकडे याचे पुरावे मागितले आहेत.