Prophet Muhammad: भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही चर्चेत प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर अनेक इस्लामिक देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणाने राजनैतिक पातळीवरही जोर पकडला असून कतार, इराण आणि कुवेत या देशांनी देशातील भारतीय राजदूतांना बोलावून नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही या मुद्द्यावरून भारतातील मोदी सरकारला घेरले आहे. आता या प्रकरणावर यूएईकडूनही प्रतिक्रिया आली आहे.
यूएई (युनायटेड अरब अमिराती) ने देखील प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करणारे निवेदन जारी केले आहे. सोमवारी यूएईच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले की, जे वर्तन नैतिक मूल्ये आणि तत्त्वांच्या विरोधात आहे, ते यूएई नाकारते. यूएईने म्हटले आहे की, सर्व धार्मिक प्रतीकांचा आदर केला पाहिजे आणि द्वेषयुक्त भाषण पूर्णपणे नाकारले पाहिजे.
इंडोनेशियानेही केला तीव्र निषेध
सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियानेही प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजप नेत्यांच्या अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे आणि ते अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, हा संदेश जकार्ता येथील भारतीय राजदूतांनाही देण्यात आला आहे.
मालदीवनेही दिली प्रतिक्रिया
मालदीवच्या संसदेत विरोधकांनी केलेल्या गदारोळानंतर तेथील सरकारनेही एक निवेदन जारी केले आहे. मालदीवच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नुपूर शर्माच्या प्रेषितांवरील वक्तव्याचा निषेध करत मोदी सरकारच्या कारवाईचे स्वागत केले आहे. दरम्यान, नुपूर शर्मा यांचे भाजपचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे.