मुंबई : पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या शपथविधी सोहळ्याला शेजारी देशातील दिग्गजांना निमंत्रित केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच नामवंत क्रिकेटपटू, अभिनेत्यांना सोहळ्याचं आमंत्रण असल्याची माहिती आहे.
अभिनेता आमीर खान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनिल गावस्कर यांना इम्रान खान यांनी शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे.
1992 मध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानी क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्यावर्षी कपिल देव भारतीय क्रिकेट संघात खेळत होते. त्यामुळे कपिल देव यांच्याशी इम्रान यांचं खास नातं आहे.
पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. इम्रान खान 11 ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील.
“इम्रान खान यांच्या शपथविधीला नरेंद्र मोदी यांच्यासह सार्क (SAARC) देशांच्या प्रमुखांनाही बोलावलं जाण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांचं विजयाबद्दल फोनद्वारे अभिनंदन केलं. हे एक चांगलं पाऊल आहे,” असं तहरीक-ए-इन्साफच्या एका नेत्याने म्हटलं होतं.
नरेंद्र मोदी यांनी 2014 साली आपल्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला सार्क देशांच्या प्रमुखांना निमंत्रित केलं होतं. मोदींच्या शपथविधीला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ हेदेखील उपस्थित राहिले होते.
पाकिस्तान निवडणुकीत काय झालं?
पाकिस्तानात 25 जुलैला 270 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक 116 जागा मिळाल्या. इम्रान यांनी स्वत: पाच जागांवर निवडणूक लढवली. या पाचही जागांवर त्यांचा विजय झाला.
इम्रान खानच्या शपथविधीला आमीर, कपिल देव, गावस्कर जाणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2018 08:12 PM (IST)
अभिनेता आमीर खान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनिल गावस्कर यांना इम्रान खान यांनी शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -