Pakistan Supreme Court Verdict: पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने उपसभापती कासिम सूरी यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळल्या प्रकरणी महत्वाचा निकाल सुनावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याचा उपसभापतींचा निर्णय रद्द करून तो घटनाबाह्य ठरवला आहे.


9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. निकालानंतर न्यायालयाबाहेर 'गो नियाजी, गो'चे नारे लागवण्यात आल्या आहेत. इम्रान खान यांचा अविश्वास प्रस्तावात पराभव झाला तर विरोधकांनी नवीन पंतप्रधान निवडावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोणत्याही सदस्याला मतदान करण्यापासून रोखले जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या निर्णयाबाबत बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले की, पाकिस्तान झिंदाबाद, लोकशाहीचा हा सर्वात मोठा सूड आहे. या निर्णयानंतर विरोधकांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.


निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, आम्ही निवडणुका घेण्यास तयार आहोत. सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती एजाज-उल अहसान, न्यायमूर्ती मजहर आलम खान मियांखाइल, न्यायमूर्ती मुनीब अख्तर आणि न्यायमूर्ती जमाल खान मंडोखाइल यांचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीदरम्यान निर्णय राखून ठेवला होता.


निकालापूर्वी इम्रान खान म्हणाले होते की, जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल. सर्वोच्च न्यायालयाने निकालापूर्वी निवडणूक आयोगाच्या टीमलाही पाचारण केले होते. सुप्रीम कोर्टात निवडणूक आयुक्तांच्या टीमने लवकर निवडणुका घेणे शक्य नसल्याचे सांगितले. त्याचवेळी इम्रान खान यांचे निकटवर्तीय फवाद चौधरी म्हणाले की, काहीही झाले तरी शेवटी निवडणुका घ्याव्याच लागणार आहेत. निकालापूर्वी सर्वोच्च न्यायालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयाबाहेर लोकांमध्ये हाणामारी झाल्याचीही चर्चा आहे.


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha