इस्लामाबाद : पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाचे (पीटीआई) प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इमरान  खान पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ 14 ऑगस्ट म्हणजेच पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी घेऊ शकतात.  या बद्दलची माहिती एका वृत्तामधून समोर आली आहे.

यापूर्वी 30 जुलैला इमरान खान यांनी 11 ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच तहरीक-ए-इन्साफ पक्षाने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी इतर पक्षांशी वाटाघाटी पूर्ण झाल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानचे अंतरिम कायदे मंत्री अली जफर यांनी “देशाचे नवीन पंतप्रधानांचा शपथविधी 14 ऑगस्टला व्हावा अशी माझी आणि अंतरिम पंतप्रधान निवृत्त न्यायाधीश नसीरुल यांची अशी इच्छा असल्याचे सांगितले आहे.”

पाकिस्तान निवडणुकीत काय झालं?

पाकिस्तानात 25 जुलैला 270 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत इमरान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक 116 जागा मिळाल्या. इमरान यांनी स्वत: पाच जागांवर निवडणूक लढवली. या पाचही जागांवर त्यांचा विजय झाला.

दरम्यान, इमरान खान यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरीही बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 137 जागा त्यांना मिळू शकलेल्या नाहीत.