भारतातील बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावून, 2 मार्च 2016 रोजी विजय मल्ल्या भारताबाहेर फरार झाला. त्यानंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनकडे मागणी केली. त्याबाबत लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी मल्ल्याने हा गौप्यस्फोट केला.
“संपूर्ण प्रकरण सेटल करण्यासाठी भारत सोडण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. मी बँकांचे कर्ज भरण्यासाठी तयार होतो. मात्र बँकांनी माझ्या सेटलमेंटवर प्रश्न उपस्थित केले.” असे विजय मल्ल्या म्हणाला.
माझ्यावरील आरोपांशी मी सहमत नाही. तरी कोर्टाला निर्णय घेऊ द्या, असेही विजय मल्ल्याने यावेळी सांगितले.
विरोधक आक्रमक
विजय मल्ल्याच्या या गौप्यस्फोटानंतर विरोधकांनी अर्थमंत्री अरुण जेटलींसह मोदी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
“नीरव मोदी देश सोडण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचित करतो. विजय मल्ल्या देश सोडण्याआधी अर्थमंत्र्यांशी बोलतो. या बैठकांमध्ये नेमकं काय झालं? जनतेला माहिती हवीय.”, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.
अरुण जेटलींचं स्पष्टीकरण
कर्जबुडव्या विजय मल्ल्याने देश सोडण्याआधी अर्थमंत्री जेटलींना भेटल्याचे सांगितल्यानंतर, तातडीने अर्थमंत्री अरुण जेटलींनी पत्रक काढून स्पष्टीकरण दिले.
जेटली म्हणाले, "मला भेटून सेटलमेंटची ऑफर दिली, हे विजय मल्ल्या यांचे विधान पूर्णपणे चुकीचं असून, सत्य दर्शवत नाही. 2014 पासून विजय मल्ल्या यांना भेटण्याची वेळ दिली नाही. त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
जेटलींचं स्पष्टीकरणाचं पत्रक :