Sheikh Hasina Mango Diplomacy : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना (Bangladesh PM Sheikh Hasina) यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एक मेट्रिक टन आंब्याची खास भेट पाठवली आहे. आंबा-हिल्सा डिप्लोमसीची परंपरा कायम ठेवत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासाठी खास आम्रपाली जातीच्या आंब्याची भेट पाठवली आहे. बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 


पूर्वीची परंपरा पुढे सुरु ठेवत पंतप्रधान हसिना यांनी राष्ट्रपती कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांना भेट म्हणून एक मेट्रिक टन आम्रपाली आंबे पाठवले आहेत, असे उच्च आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेट म्हणून 2600 किलो आंबे पाठवले होते. हे आंबे रंगपूर जिल्ह्यातील हरिभंगा जातीचे होते. हे आंबे बेनापाल चेकपोस्टवरून भारतात पाठवण्यात आले होते.


भारताची शेजारील देशांसोबत 'मँगो डिप्लोमसी' 
'मँगो डिप्लोमसी' आशिया खंडातील राजकारणाचा एक भाग आहे. एकेकाळी भारत आणि पाकिस्तानमध्ये आंबे पाठवले जायचे. पाकिस्तानचे माजी हुकूमशहा झिया-उल-हक आणि परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानच्या नेत्यांपैकी आहेत, त्यांनी भारताला आंबे भेट म्हणून पाठवले होते. बांगलादेशने 2020 मध्ये दुर्गा पूजेच्या निमित्ताने आपल्या व्यापाऱ्यांना हिल्सा मासे निर्यात केले. बांगलादेशने 1,500 टन हिल्सा मासे भारतात पाठवण्यासाठी विशेष परवानगी घेतली होती. हा मासा सीमेच्या दोन्ही बाजूच्या लोकांना खूप आवडतो. 


शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठीची जुनी परंपरा
भारताने 22 एप्रिल रोजी बांगलादेशला कोरोनासोबत लढण्यासाठी मदत म्हणून औषधे पाठवली होती. त्यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते. बांगलादेशच्या पंतप्रधानांनी कोविड महामारीदरम्यान औषधांच्या देवाणघेवाणीबद्दल भारत सरकार आणि WHO या दोघांचे आभार मानले. शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.