United Nations Observances: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून जागतिक गद्दार दिन साजरा करावा अशी मागणी केली. 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत बंड केले. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. आजचा दिवस म्हणजे 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा, या मागणीचे पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांना लिहिले आहे. मात्र, एखाद्या पत्रावरून संयुक्त राष्ट्र संघाला दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतो का, हा खरा प्रश्न आहे. 


संयुक्त राष्ट्राकडून एखाद्या विशिष्ट कारणांसाठी विशिष्ट दिवस साजरा करण्यात येतो. मात्र, त्यासाठी एक निश्चित अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संयुक्त राष्ट्राकडून संबंधित दिवस साजरा करण्यात येतो. 


आमसभा ही संयुक्त राष्ट्र संघाचे सर्वात प्रातिनिधिक आहे. या आमसभेत एक विशिष्ट तारीख आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून जाहीर करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय दिवस सदस्य राष्ट्रांद्वारे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत प्रस्तावित केले जातात. त्यानंतर ठराविक दिवसाची स्थापना करण्याचा ठराव स्वीकारायचा की नाही हे सर्वसाधारण सभा सर्वसंमतीने ठरवते.


आंतरराष्ट्रीय दिवसांच्या थीम नेहमी संयुक्त राष्ट्रांच्या कृतीच्या मुख्य क्षेत्रांशी जोडल्या जातात, म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखणे, शाश्वत विकासाचा प्रचार, मानवी हक्कांचे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवतावादी कारवाईची हमी आदी मुद्दे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय दिवस साजरे केले जातात. 


आपल्या ठरावांमध्ये, सर्वसाधारण सभेने आंतरराष्ट्रीय दिवसाची घोषणा करण्यास कशामुळे प्रवृत्त केले हे स्पष्ट करते. उदाहरणार्थ, 23 मे रोजी प्रसूती फिश्टूला निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस घोषित करताना, ठरावाने "गरिबी, कुपोषण, अभाव किंवा अपुरी किंवा दुर्गम आरोग्य-सेवा, लवकर बाळंतपण, बालविवाह, तरुण स्त्रियांवरील हिंसाचार आणि यांतील परस्पर संबंधांचा उल्लेख केला. प्रसूती फिश्टुलाचे मूळ कारण म्हणून मुलीवर पाहण्याचा दृष्टीकोन, लिंग भेदभाव आणि गरिबी आदी मुख्य घटक असल्याचे सांगण्यात आले.


विकसनशील देशांतील सुमारे दोन दशलक्ष स्त्रियांना या आजाराची बाधा होते. दरवर्षी 50,000 ते एक लाख नवीन प्रकरणे घडतात. हे तथ्य असूनही, या आजाराबद्दल बऱ्याच  लोकांनी कदाचित कधीच ऐकले नसेल. ज्यामुळे बाळामध्ये जन्मत: काही आजार असण्याची शक्यता असते. आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करत असताना जागरुकता वाढवणे हे उद्दिष्ट असल्याचे या उदाहरणावरून दिसून येते. 


संयुक्त राष्ट्र संघ एखादा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करताना सदस्य देशातील एखाद्या महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर जगाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो. 23 जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाच्या ठरावात महासभेने असे म्हटले की, "लाखो विधवांच्या मुलांना उपासमार, कुपोषण, बालमजुरी, अडचणींचा सामना करावा लागतो याविषयी अत्यंत चिंतेची बाब आहे. आरोग्य सेवा, पाणी आणि स्वच्छता, शालेय शिक्षणाची हानी, निरक्षरता आणि व्यक्तींची तस्करी आदी मुद्यांकडे ठरावाने लक्ष वेधले आहे. 


काही आंतरराष्ट्रीय दिवसांची घोषणा जनरल असेंब्लीद्वारे केली जात नाही. परंतु संयुक्त राष्ट्रांच्या विशेष एजन्सीद्वारे आरोग्य, विमान वाहतूक, बौद्धिक संपदा इत्यादीसारख्या विषयांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी केली जाते. उदाहरणार्थ, जागतिक वृत्तपत्रे स्वातंत्र्य दिन, हा पॅरिसमध्ये असलेल्या संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) द्वारे घोषित करण्यात आला आणि नंतर महासभेने तो स्वीकारला. 


संयुक्त राष्ट्राकडून काही दिवस हे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून करण्यासाठी आयोजित केले जातात. 22 मे रोजी साजरा करण्यात आलेल्या जैविक विविधतेच्या आंतरराष्ट्रीय दिनाबाबतचा ठराव याचे उदाहरण आहे. यामध्ये संयुक्त राष्ट्र आपल्या सदस्य राष्ट्रांना जैव विविधतेच्या संरक्षणावरील कार्टेजेना प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्यासाठी आणि त्याला मान्यता देण्यासाठी प्रयत्न करते.