मुंबई : कोरोना (Cotonavirus) काळात जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळासाठी इंटरनेट, संगणकाची आणि मोबाईलची स्क्रीन यासमोरच अधिकाधीक वेळ व्यतीत करणाऱ्या अनेकांच्याच मनात बहुविध प्रश्न घर करु पाहात होते. याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी इंटरनेटच्या उपलब्धतेमुळं अनेकजण धडकले थेट (Google) गुगलच्या सर्च बॉक्समध्ये.
यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये गुगलवर सगळ्यात जास्त सर्च करण्यात आलेलं वाक्य ठरत आहे पनीर कसं बनवावं याबाबतची माहिती. गुगलकडून एक व्हीडियो तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये २०२० या वर्षात जगभरात लोकांनी काय सर्च केलं याची माहिती दिली आहे. ज्यामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर 'का' हा शब्द असल्याची माहिती समोर येत आहे. कोविड १९ का म्हटले जाते? हा प्रश्न संपूर्ण जगात सगळ्यात जास्त विचारण्यात आला हे या व्हिडीओमध्ये स्पष्ट होत आहे.
जाणून घ्या, Google ला कशी सापडतात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं
अतिशय सुरेख अशा पद्धतीनं जगभरातील परिस्थिती आणि असंख्य जणांच्या मनात असणाऱ्या प्रश्नाना गुगलनं कसा आसरा दिला आणि कशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरं दिली याची प्रचिती या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ गुगलकडून प्रसिद्ध करण्यात आला होता.
गुगल सर्चमध्ये डल्गोना कॉफी कशी बनवायची, घरच्या घरी सॅनिटायझर कसं बनवायचं असेही प्रश्न विचारण्यात आले. सॅनिटायझरचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याच्या बातम्या व्हायरल होऊ लगाल्या, त्यादरम्यान या आशयाचे अनेक प्रश्न गुगलला विचारण्यात आले.
यंदाच्या वर्षी सर्च करण्यात आलेल्या विषयांमध्ये अनेकांचा कल हा स्वत:पेक्षा इतरांकडे जास्त असल्याचं दिसून आलं. उदाहरणार्थ, दान कसं करावं... याबाबतही सर्वाधिक सर्च करण्यात आलं. कोरोनाच्या संकटाचं गांभीर्य पाहता, कोरोना म्हणजे काय?, प्लाझ्मा थेरेपी म्हणजे काय?, कोविड 19 आहे तरी काय़? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी नेटकऱ्यांनी गुगलची मदत घेतली.