इस्लामाबाद : मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने पाकिस्तानलाच धमकी दिली आहे. सरकारमध्ये दम असेल, तर अटक करुन दाखवाच, असं आव्हान त्याने पाक सरकारला दिलं आहे.
“भारत आणि अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानी मीडियातून त्याच्या कव्हरेजला बंदी घालण्यात आली आहे. जर मला दाबण्याचा प्रयत्न केला, तर मी पूर्ण ताकदीनिशी पुन्हा उभा राहिन.” अशी धमकी हाफिजने दिली आहे.
विशेष म्हणजे, त्याने पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. “जर नवाज शरीफांनी काश्मीरचा मुद्दा आमच्या म्हणण्याप्रमाणे मांडला, तर त्यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यास आम्ही मदत करु,” असं त्यानं म्हटलं आहे.
कोण आहे हाफिज सईद?
हाफिज सईद हा दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख आहे. तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा तो सह-संस्थापकही आहे. भारतातील अनेक दहशतवादी हल्ले या दोन्ही संघटनांनी केले होते. तसेच, मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्लादेखील त्यानेच घडवून आणला होता.
याशिवाय, अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत हाफिज दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यावर अमेरिकेने एक कोटी डॉलरचं इनाम जाहीर केलं आहे. तर भारताने इंटरपोलच्या माध्यमातून त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे. विशेष म्हणजे, संयुक्त राष्ट्र संघानेही त्याच्या जमात-उद-दावा या संघटनेला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकलं आहे.
संबंधित बातम्या
हाफिज सईदच्या नाड्या आवळल्या, अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव
अमेरिकेने पाकिस्तानला मिळणारी 255 मिलियन डॉलरची मदत थांबवली
पाकिस्तान सईदच्या आर्थिक नाड्या आवळणार; संस्था, संपत्ती ताब्यात घेणार
काश्मीर घेऊन बांगलादेश स्वातंत्र्यांचा बदला घेऊ : हाफिज सईद
मी लष्कर-ए-तोयबाचा कट्टर समर्थक : परवेज मुशर्रफ