Greenland Ice Melting Faster : ग्लोबल वॉर्मिंगची (Global Warming) समस्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जागतिक तापमानवाढ हा सध्या चिंतेचा विषय आहे. बदलती जीवनशैली आणि वाढतं शहरीकरण यामुळे अनेक दशकांपासून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पण मानव याकडे दुर्लक्ष करत आहे. पृथ्वीवरील (Earth)वाढत्या तापमानामुळे बर्फ वेगाने वितळत असून मानवासाठी धोका निर्माण झाला आहे. वाढत्या तापमानावर वेळीच उपाय न केल्यास जगबुडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बर्फ वितळून संपूर्ण पृथ्वी जलमय होईल आणि मानवाचं आयुष्य धोक्यात येईल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.


... तर जगबुडी होणार? 


ग्रीनलँडच्या (Greenland) हिमनद्या वेगाने वितळत आहेत. 20 व्या शतकाच्या तुलनेत सध्या बर्फ वितळल्याचा वेग तीन पटीने वाढला आहे. असेच सुरू राहिल्यास सखल भागातील मानवी वसाहतींचे अस्तित्व लवकरच धोक्यात येईल. जागतिक तापमानात झालेली वाढ आणि वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीवरील मानवी जीवनावर वाईट परिणाम होत आहेत. यासोबतच कार्बन उत्सर्जन (Carbon Emissions) आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे ध्रुवीय प्रदेशात हिमनद्यांचा बर्फ वितळत आहे. ग्रीनलँडमधील हिमनद्या आता 20 व्या शतकाच्या तुलनेत 3 पट वेगाने वितळत आहेत, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.


तिप्पट वेगाने वितळतायत ग्लेशियर्स


पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर असणारं ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. ग्रीनलँडचं क्षेत्रफळ 2,166,086 चौरस किमी आहे. या बेटाचा बराचसा भाग बर्फाने झाकलेला आहे. पण, गेल्या काही वर्षांत ग्रीनलँडमधील बर्फ वेगाने वितळत आहे. ग्रीनलँडमधील बर्फाच्छादित बाग कमी झाल्याचं शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आलं असून त्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे आहे. ग्रीनलँडमध्ये अनेक मोठे बर्फाचे पर्वत आणि हिमनद्या आहेत. हे वेगानं वितळणे जगासाठी धोक्याची घंटा आहे.


शास्त्रज्ञांची दिला धोक्याचा इशारा


पृथ्वीवरील बर्फ वितळल्यास जगबुडी होण्याची धोका आहे. जगबुडी होणे म्हणजे संपूर्ण पृथ्वी जलमय होणे. जिओफिजिकल रिसर्च लेटर्सच्या अहवालानुसार, ग्रीनलँडच्या हिमनद्याच्या वेगाने वितळत असल्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. ध्रुवीय प्रदेशात हिमनद्या वितळत राहिल्यास किनारपट्टी भागात असलेले अनेक देश बुडू लागतील. आतापर्यंत, जगाच्या अनेक भागांमध्ये वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे किनारी भागातील मानवी वस्त्या जलमय झाल्या असून लोक बेघर झाले आहेत.


अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वितळतायत ग्लेशियर्स 


हवामान बदलामुळे (Climate Change) पृथ्वीवरील बर्फ जलद वितळत आहे. पोर्ट्समाउथ युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंट, भूगोल आणि भूगर्भशास्त्रातील डॉ. क्लेअर बोस्टन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्लेशियर्स अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वितळत आहेत. हिमनद्या आणि वितळलेल्या बर्फाचे एकूण प्रमाण पाहिले तर ते अंदाजापेक्षा जास्त असल्याचं त्यांच्या संशोधनात आढळलं आहे.