मुंबई : गुगलकडून कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत दिवसरात्र लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अनोखा सलाम करण्यात आला आहे. जागतिक महामारी कोरोना व्हायरसचा विषय घेऊन गुगलने दुसऱ्यांदा डूडल बनवलं आहे. यावेळी गुगलने (Google) कोरोनाला पराभूत करणाऱ्या डॉक्टरांसाठी हे खास डूडल (Doodle) बनवले आहे. या खास गुगल डूडल (Google Doodle) मध्ये एका व्हिडीओच्या माध्यमातून सर्व डॉक्टर्स, नर्स आणि मेडिकल स्टॉफला 24 तास अथक सेवा दिल्याबद्दल धन्यवाद देण्यात आले आहेत.


या व्हिडीओमध्ये लोकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी केल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. गुगलच्या या डूडलला क्लिक केल्यानंतर एक व्हिडीओ ओपन होतो. या व्हिडीओमध्ये वेगवेगळे डॉक्टर लोकांना सल्ले आणि सूचना देताना दिसत आहेत. 'ही वेळ आहे, देशात एकजूट आणायची. शांत राहायची. आपला परिवार आणि देशाचं रक्षण आता केवळ आपल्या हातात आहे. या महामारीत सर्वाधिक गरजेचं आहे की, आवश्यक वस्तूंचा वापर त्याच जागी व्हावा जिथं त्या वस्तूंची सर्वाधिक गरज आहे. जसं की, मास्क आणि सॅनिटायझर.' असं या व्हिडीओत डॉक्टर सांगत आहेत. यात डॉक्टर म्हणतात 'आम्ही आपल्यासाठी काम करत आहोत, आपण घरातच राहा.'

आपल्या जीवाची परवा न करता दिवसरात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे गुगलने आभार मानले आहे. हे सर्वजण करत असलेल्या कामाबद्दल गुगलने डूडलद्वारे आभार मानले आहे.

गुगलने याआधी देखील 2 एप्रिल रोजी डूडल तयार केले होते. या डूडलद्वारे गुगलने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केले होते. यात गुगलने तयार केलेल्या डूडलचे प्रत्येक अक्षर हे घरामध्येच राहून कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक कामात व्यग्र असल्याचा संदेश देत होते.

पाहा गुगलच्या डूडलमधील व्हिडीओ



जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 18500 लाख पार पोहोचली आहे. तर आतापर्यंत एक लाख 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वेबसाइट वल्डोमीटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 1,853,155 वर पोहोचली आहे. तर 114,247 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. तर मृतांच्या आकड्यांमध्ये इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतात लॉकडाऊन असूनही कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 8447 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 7409 कोरोना बाधित आहेत. तर 764 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.