मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या त्यांनी आज सॅन फ्रॅन्सिस्को येथे प्रमुख कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन राज्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रात त्यांचा सहयोग घेण्याबाबत चर्चा केली.


यावेळी गूगलचे प्रतिनिधी विनय गोयल यांच्यासोबत झालेल्या भेटीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीदरम्यान मुंबईला वायफाय सिटी बनविण्यासाठी गुगलने पाठबळ देण्याची तयारी दर्शविली आहे.


 

या शिवाय एआयआरबीएनबीचे प्रतिनिधी ख्रिस लेहान आणि माइक ऑर्जिल यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत राज्यातील पर्यटनाच्या वृद्धीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देतानाच राज्य पर्यटन विकास महामंडळाशी सामंजस्य करार करण्याबाबतचा प्रस्ताव कंपनीच्या विचाराधीन असल्याचे सांगितले.

सब्से टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सबीर भाटिया यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत शाश्वत कृषी विकासासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शक्य असलेल्या प्रयत्नांबाबत चर्चा केली. तसेच ॲपको वर्ल्डवाइडचे अध्यक्ष इव्हान क्रौस यांच्याशीही मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली.