Sinkhole in China: चीनमध्ये आजही अशी अनेक ठिकाणं आहेत, जे अद्यापही जगासमोर आलेली नाहीत. तसेच चीनमध्ये असे अनेक रहस्य देखील आहेत, जे जाणून घेण्याची उत्सुकता अवघ्या जगाला आहे. अशातच चीनच्या हुबेई प्रांतातील (Hubei Province) झुआनएन काउंटीमध्ये  (Xuan'en County) एक महाकाय दरी सापडली आहे. याचा शोध चीनच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या दरीच्या खाली भलेमोठे जंगलही आहे. ही दरी एकूण 630 फूट खोल आहे. 6 मे रोजी शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला आहे.

या दरीची रुंदी 493 फूट असून लांबी 1004 फुटांपेक्षा जास्त आहे. याचा पूर्ण आकार 50 लाख घनमीटर सांगितला जात आहे. चायना जिऑलॉजी सर्व्हे इन्स्टिट्यूट ऑफ कार्स्ट जिओलॉजीचे वरिष्ठ अभियंता झांग युआनहाई यांनी सांगितले की, या दरीजवळील भिंतीमध्ये तीन मोठ्या गुहा आहेत. या सर्वांचा उगम एकत्रितपणे झाला असण्याची शक्यता आहे. 

Guangxi 702 Cave Expedition Team चे नेते चेन लिशिन यांनी सांगितले की, या दरीच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात प्राचीन वृक्ष आहेत, जे सुमारे 120 फूट उंच आहेत. चीनमध्ये अशा मोठ्या दरीना तिआनकेंग म्हणतात. या दरीच्या आत अनेक गुहाही आहेत. सहसा अशा भूवैज्ञानिक आकृत्या चीन, मेक्सिको आणि पापुआ न्यू गिनीमध्ये आढळतात. 

अमेरिकेतील नॅशनल केव्ह अँड कार्स्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक आणि गुहा तज्ञ जॉर्ज वेनी यांनी सांगितले की, ही एक चांगली बातमी आहे. जॉर्ज वेनी या शोधात सहभागी नाही. मात्र त्यांची संस्था चिनी शास्त्रज्ञांशी संबंधित आहे. जॉर्ज म्हणाले की, कार्स्ट टोपोग्राफी सामान्यतः दक्षिण चीनमध्ये दिसून येते.

कार्स्ट टोपोग्राफी दरी आणि गुहांनी भरलेली आहे. येथे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. जे वर्षानुवर्षे त्याच जागी पडून राहून त्याचे अॅसिडिक बनते. त्यामुळे आतमध्ये अनेक बोगदे आणि नळ्या तयार होतात. पाण्यामुळे खड्डे मोठे होतात. पण दरीच्या आकाराचे मोठे खड्डे सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जॉर्ज वेनी यांनी सांगितले की, अमेरिकेचा 25 टक्के भाग समान भौगोलिक परिस्थितीने भरलेला आहे. मात्र येथे ज्वालामुखी किंवा वाऱ्यामुळे खड्डे तयार झाले आहेत. ग्वांग्शी स्वायत्त प्रदेशात कार्स्टची निर्मिती मोठ्या प्रमाणात दिसून येते. ज्यामुळे या भागाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा मान मिळाला आहे.

झांग युआनहाई यांनी सांगितले की, चीनमध्ये याला दैवी विवर म्हणतात. यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नसून लोककथा आहेत. मात्र या खड्ड्यांच्या आत नवीन जग पाहायला मिळते. सध्या शास्त्रज्ञ त्याच्या आत जाऊन इथल्या जंगलांचा आणि प्राण्यांचा अभ्यास करण्याच्या तयारीत आहेत. या कामात जोखीम असली तरी पृथ्वीचे हे न सुटलेले कोडे समजून घेण्यासाठी हे करणे आवश्यक आहे.