मुंबई : मुंबईत आणखी एक हायप्रोफाईल बलात्कारप्रकरण समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे फेसबुकवरुन पाठवलेल्या फ्रेण्ड रिक्वेस्टचं रुपांतर प्रेमात आणि मग हीच मैत्री पुढे लग्नापर्यंत पोहोचली. मात्र लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या तरुणावर बलात्काराचा आरोप आहे, तो सौदी अरेबियात भारतीय दुतावासात नोकरीला आहे.


 

जबीउल्ला शाद खान असं आरोपी तरुणाचं नाव असून, पीडित तरुणीने आता मदतीसाठी थेट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना हाक दिली आहे.

 

जबीउल्ला हा सौदी अरेबियातील रियाद शहरात भारतीय राजदुतात नोकरीला आहे.

 

काय आहे प्रकरण?

आशमा (बदललेलं नाव) आणि जबीउल्ला शाद खान यांची ऑक्टोबर 2015 मध्ये फेसबुकवरुन मैत्री झाली. जबीउल्लाची फ्रेण्ड रिक्वेस्ट आशमाने स्वीकारली. पुढे त्यांचं फेसबुक चॅटिंग वाढलं आणि हे चॅटिंग कधी प्रेमाच्या 'सेटिंग'मध्ये बदललं हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही.

 

आशमाचा दावा

फेसबुकवरुन एकमेकांच्या प्रेमात पडलेले आशमा आणि जबीउल्ला यांचा चॅटिंग टाईम वाढला होता. यादरम्यान एप्रिल 2016 मध्ये जबीउल्ला मुंबईत आला होता. फेसबुकवरुन भेटणारे आशमा-जबीउल्ला हे प्रत्यक्षातही भेटले. या भेटीत दोघांनी लग्न करण्याचा निर्णय पक्का केला. त्याचदरम्यान त्यांची जवळीक आणखी वाढली.

 

लग्नाच्या आमिषाने बलात्कार

जबीउल्लाने लग्नाचं आश्वासन दिल्याने, आशमाने त्याला 'कशाचीही' ना केली नाही. मात्र इथेच ती फसली होती. जबीउल्लाने तिला लग्नाचं आमिष दाखवून तिचा उपभोग घेतला. तीन दिवस मुंबईत राहून नंतर तो पुन्हा नोकरीच्या निमित्ताने सौदीला गेला, ते परत फिरकलाच नाही.

 

लग्नासाठी टाळटाळ करणाऱ्या जबीउल्लाने आपल्याला फसवल्याचं आशमाच्या लक्षात आलं. तिने जबीउल्लाची वारंवार विनवणी केली, मात्र त्याने ताकासतूर लावला नाही.

 

जबीउल्लाची टाळटाळ

आशमाने जबीउल्लाला लग्नासाठी वारंवार विचारणा केली. मात्र त्याने सातत्याने टाळाटाळ केली. मात्र आशमा सातत्याने विचारणा करु लागल्याने जबीउल्ला तिला धमकी देऊ लागला.

 

इंटरनेटवर फोटो अपलोड

धक्कादायक म्हणजे जबीउल्लाने आशमाचे 'प्रायव्हेट फोटो', व्हिडीओ सौदीत पसरवू लागल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्याने काही फोटो, व्हिडीओही इंटरनेटवर अपलोड केले होते, जे मुंबई पोलिसांनी हटवले आहेत.

 

आरोपीच्या कुटुंबीयांकडून अॅसिड हल्लाची धमकी

आशमाने सातत्याने लग्नासाठी पाठपुरावा केल्याने जबीउल्लाच्या कुटुंबीयांनीही त्याचीच बाजू घेतली. इतकंच नाही तर जबीउल्लाच्या कुटुंबीयांनी आशमाला अॅसिड हल्ल्याचीही धमकी दिली. तसा आरोप आशमाने फैजुल्ला खान आणि रिझवान खानविरोधात केला आहे.

 

कांदिवली पोलिसांत गुन्हा

जबीउल्लाने धोक्याचं टोक गाठल्याने आशमाने मुंबईतील कांदिवली पोलिसात धाव घेत, जबीउल्लाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याशिवाय आयटी अॅक्ट, फसवणूक असे गुन्हेही नोंदवण्यात आले. तसंच जबीउल्लाच्या धमकीमुळे आशमाला पोलिस संरक्षणही दिलं आहे.

 

भारतीय दुतावासाची मदत

आशमाने न्याय मिळण्यासाठी आता भारतीय दुतावास आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची मदत मागितली आहे.

 

"एका भारतीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी तुमच्या दुतावासात लपला आहे. इतकंच नाही तर तो मला धमकीही देत असून, फोटो आणि व्हिडीओही इंटरनेटवर अपलोड करत आहे, त्यामुळे मला न्याय द्या", अशी मागणी आशमाने सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे.