Shooting in hamburg Germany: जर्मनीच्या (Germany) हॅम्बर्ग शहरातून (Hamburg Shooting) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हॅम्बर्गमधील एका चर्चमध्ये अचानक गोळीबार झाला. या घटनेत तब्बल 24 लोक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर तब्बल सात जणांना जीव गमवावा लागला आहे. जर्मन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वा नऊच्या सुमारास गोळीबार झाला. दरम्यान, पोलिसांनी स्थानिकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. तसेच, घरातच राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 


पोलिसांनी ट्विटरवर सांगितलं की, "प्राथमिक माहितीनुसार, ग्रोसबोरस्टेल जिल्ह्यातील डेलबोझ स्ट्रीट येथील चर्चमध्ये गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अनेक लोक गंभीर जखमी झाले, काहींना प्राणही गमवावे लागले." दरम्यान, पोलिसांनी परिसरातील लोकांना सतर्क करण्यासाठी सूचना देणाऱ्या अॅपचा वापर केला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी रात्री सव्वा नऊच्या सुमारास चर्चमधील लोकांवर गोळीबार केला. मात्र, हल्लेखोर किती होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करत आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. 


पोलिसांकडून लोकांना घरातच राहण्याचं आवाहन 


जर्मन पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अनेक रस्ते बंद करण्यात आले असून लोकांना या परिसरापासून दूर राहण्यास सांगितलं आहे." या संदर्भातील मेसेजही लोकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आले आहेत. स्थानिक रहिवाशांना घरातच राहण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच, अगदी आवश्यक असेल तेव्हाच फोन वापरण्यास सांगण्यात आलं आहे.






हल्ल्यामागील हेतू अद्याप अस्पष्टच


या हल्ल्यामागील हेतूबद्दल, पोलीस प्रवक्त्यानं बोलताना सांगितलं की, "या गुन्ह्यामागील हेतूबद्दल अद्याप कोणतीही विश्वसनीय माहिती मिळालेली नाही." हॅम्बर्गचे महापौर पीटर स्नित्झर म्हणाले की, "पीडितांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आणि पार्श्वभूमी स्पष्ट करण्यासाठी पोलीस वेगानं काम करत आहेत."


गेल्या काही वर्षात जर्मनीमध्ये हल्ले वाढले


जर्मनीमध्ये अलिकडच्या वर्षात जिहादी आणि अतिरेक्यांनी अनेक हल्ले केले आहेत. डिसेंबर 2016 मध्ये, बर्लिन ख्रिसमस मार्केटमध्ये इस्लामी अतिरेक्यांनी केलेल्या सर्वात घातक ट्रक हल्ल्यात 12 लोक ठार झाले होते. त्याचवेळी ट्युनिशियामध्ये काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता.


फेब्रुवारी 2020 मध्ये, मध्य जर्मन शहर हानाऊ येथे उजव्या विचारसरणीच्या अतिरेक्याने 10 लोकांची गोळ्या झाडून हत्या केली आणि पाच जण जखमी झाले होते. 2019 मध्ये, योम किप्पूरच्या ज्यू सुट्टीच्या दिवशी एका निओ-नाझीने हॅलेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याने गोळी झाडली, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता.