Germany: युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जर्मनीकडे पाहिले जाते. जर्मनी जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून जर्मनी मंदीच्या (Germany Recession) गर्तेत अडकली आहे. जर्मनीच्या जीडीपीचे (Germany GDP) आकडे आलेत आणि यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सोबतच महागाईमुळे नागरिक देखील हैराण झाल्याचं चित्र दिसतंय.  परिणामी मंदीची जर्मनीत सुरुवात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. 


सलग दोन तिमाहीत नकारात्मक वाढ नोंदवते (Germany GDP)


2023 च्या पहिल्या तिमाहीत जर्मनीची अर्थव्यवस्थेने (Germany Economy) नकारात्मक वाढ नोंदवली. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, जर्मनीचा जीडीपी  0.3 टक्क्यांनी घसरला आहे. याआधी 2022 च्या चौथ्या तिमाहीत जर्मनीचा जीडीपी 0.5 टक्क्यांनी घसरला होता. जेव्हा एखादी अर्थव्यवस्था सलग दोन तिमाहीत नकारात्मक वाढ नोंदवते, तेव्हा मंदी असल्याचं मानलं जातं. 


जर्मनीची आर्थिक वाढ मोठ्या प्रमाणावर निर्यातीवर अवलंबून (Germany Economy) 


जर्मनीची आर्थिक वाढ मोठ्या प्रमाणावर निर्यातीवर अवलंबून आहे. विशेषत: चीनमध्ये फोक्सवॅगन वर्षानुवर्षे प्रबळ ऑटोमेकर आहे. आशियात चिनी बनावटीच्या इलेक्ट्रिक वाहनांची पसंती वाढली. त्यामुळे आशियात फोक्सवॅगनच्या विक्रीत 15 टक्के घट नोंद झाली. गेल्या वर्षाच्या अखेरीस जर्मन औद्योगिक कंपन्यांना ऊर्जेच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे जर्मनीला नैसर्गिक वायू किंवा एलएनजी विकत घ्यावं लागतंय जे रशियाच्या  पाईपलाईनद्वारे पुरवठा होणाऱ्या गॅसपेक्षा अधिक महाग आहे. त्यामुळे देखील उत्पादन कमी करण्याची वेळ कंपन्यांवर ओढवली आहे


जर्मनीमध्ये महागाईचा दर एप्रिलमध्ये 7.6 टक्के इतका उच्चांकी (Germany Inflation) 


जर्मनीत महागाईमुळे देखील नागरिक हैराण झालेत. कारण, रशियाकडून ऊर्जा पुरवठ्याचा इशारा दिल्यानंतर महागाई दरात वाढ झाली आहे. जर्मनीमध्ये महागाईचा दर एप्रिलमध्ये 7.6 टक्के इतका उच्चांकी बघायला मिळाला आहे.  दुसरीकडे, वाढत्या माहागाईमुळे युनियन्सकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यासाठी जोर दिला जातोय.  त्यामुळेही आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या कंपन्यांवर आणखी आर्थिक भार पडणार आहे


अनेक राष्ट्रांसाठी चिंतेची बाब


युक्रेन-रशियाचा  युद्धाचा (Russia-Ukraine war) सर्वाधिक फटका युरोपियन देशांना बसला आहे.  आधी अन्नधान्यांचा तुटवडा निर्माण झाला तो सुरळीत होण्याआधीच युरोपियन देशांवर उर्जा संकट आलंय. तिकडे अमेरिकेतही मंदीचं सावट आहे आणि नेमकं याच काळात जर्मनीतही आर्थिक मंदीची सुरुवात होणं अनेक राष्ट्रांसाठी चिंतेची बाब आहे.


हे ही वाचा :


बिअर प्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता झटपट घरबसल्या तयार करा थंडगार बिअर