Gabriel Attal Becomes France Youngest PM: फ्रान्स : फ्रान्सच्या (France) पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न (PM Elisabeth Borne) यांनी सोमवारी (8th January 2024) आपल्या पदाचा राजीनामा दिला. इमिग्रेशनच्या मुद्द्यावरून वाढत्या राजकीय तणावामुळे पंतप्रधान एलिझाबेथ यांनी राजीनामा दिला. एलिझाबेथ बोर्न यांनी राजीनामा दिल्यानंतर 34 वर्षीय गॅब्रिएल अटल फ्रान्सच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यावर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकीपूर्वी मोठे फेरबदल केले आहेत. गॅब्रिएल हे फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान बनले आहेत. 2022 मध्ये सर्वात तरुण मंत्री म्हणून शपथ घेणारे गॅब्रिएल आतापर्यंत शिक्षण विभागाची जबाबदारी सांभाळत होते. मंगळवारी त्यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेण्यात आला.


वास्तविक, इमिग्रेशनच्या मुद्द्यावरून वाढत्या राजकीय तणावामुळे एलिझाबेथ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर गॅब्रिएल यांच्यासोबतच इतरही अनेक नावं पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सामील झाली होती. मात्र, मंगळवारी गॅब्रिएल यांच्या नावाची औपचारिक घोषणा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केली आणि  34 वर्षीय गॅब्रिएल अटल फ्रान्सच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. 


जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान, गॅब्रिएल अटल नेमके आहेत कोण? 


वयाच्या 34 व्या वर्षी गॅब्रिएल अटल हे फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. हा विक्रम याआधी लॉरेंट फॅबियस यांच्या नावावर होता, जे वयाच्या 37 व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. 1984 मध्ये फ्रँकोइस मिटरँड यांनी त्यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं होतं. 


अटल हे फ्रान्सचे पहिले समलैंगिक पंतप्रधान आहेत. त्याच्याबाबतची ही माहिती 2018 मध्ये त्यांच्याच एका शाळेतील सहकाऱ्यानं सार्वजनिक केली होती, जेव्हा त्याला मॅक्रॉनच्या पहिल्या आदेशादरम्यान ज्युनिअर मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यावेळी, अटल मॅक्रॉनचे माजी राजकीय सल्लागार स्टेफेन सेजॉर्न यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. 


अटल 17 वर्षांचे असताना त्यांनी सोशलिस्ट पार्टीत प्रवेश केला. साथीच्या आजाराच्या वेळी सरकारचे प्रवक्ते म्हणून त्यांनी काम पाहिलं, त्यावेळी ते फ्रान्सच्या राजकारणातील लोकप्रिय चेहरा बनले. नंतर त्यांना अर्थ मंत्रालयात कनिष्ठ मंत्री म्हणून आणि नंतर 2023 मध्ये शिक्षण मंत्री म्हणून नाव देण्यात आलं. यानंतर त्यांनी मॅक्रॉन यांच्या मंत्रिमंडळात एक वेगळी ओळख निर्माण केली.


गेल्या वर्षी शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अटल यांनी उचललेलं पहिलं पाऊल म्हणजे, राज्यातील शाळांमध्ये मुस्लिम अबाया ड्रेसवर बंदी घालणं, ज्यामुळे डावे असूनही अनेक पुराणमतवादी मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांची बरीच चर्चा झाली होती.


अटल नुकतेच एका प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये सहभागी झाले होते. मिडल स्कूलमध्ये असताना एका माजी वर्गमित्राकडून त्यांचा कसा छळ झाला, हे त्यांनी या शोमध्ये सांगितलं. याबाबत बोलताना ते म्हणाले होते की, इंटरनेट क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल बरंच काही शेअर करण्यात आलं होतं, त्यामुळे ते लाजत होते.


अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी मॅक्रॉन यांचा मोठा निर्णय


फ्रान्समधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅक्रॉन यांना युरोपियन संसदेच्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या दुसऱ्या जनादेशात काही नवे बदल करायचे होते. यामुळे एलिझाबेथ यांना हटवून नव्या पंतप्रधानांना संधी देण्यात आली आहे. खरं तर, मॅक्रॉन पुन्हा एकदा फ्रान्सच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर, एलिझाबेथ यांची मे 2022 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. जवळपास दोन वर्ष एलिझाबेथ या पदावर होत्या. या पदावर पोहोचणाऱ्या त्या फ्रान्सच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान होत्या. पण त्यांनी इमिग्रेशनच्या मुद्द्यावर घेतलेल्या निर्णयांमुळे राजकीय तणाव वाढू लागला आणि त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.