एकही सुट्टी न घेता सतत काम करणाऱ्या बेकरला दोन लाखाचा दंड
एबीपी माझा वेब टीम | 19 Mar 2018 08:54 PM (IST)
फ्रान्समधील एका बेकरवर 3600 यूरो म्हणजे दोन लाखचा दंड ठोठावण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे, त्याने 2017 च्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आठवड्याभरात एकही सुट्टी न घेता, आपली बेकरी सुरु ठेवली होती.
पॅरिस : जर एखाद्याने सुट्टी घेण्याचे टाळून सतत काम केले, म्हणून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केल्याचे तुम्हाला कुणी सांगितले, तर तुमचाही विश्वासही बसणार नाही. पण फ्रान्समध्ये अशी घटना घडली आहे. फ्रान्समधील एका बेकरवर 3600 यूरो म्हणजे दोन लाखचा दंड ठोठावण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे, त्याने 2017 च्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आठवड्याभरात एकही सुट्टी न घेता, आपली बेकरी सुरु ठेवली होती. काय आहे प्रकरण? फ्रान्समधील नोकरदारवर्गासह लघु उद्योजकांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आठवड्याला सुट्टी घेणे बंधनकारक आहे. पण 41 वर्षीय सेड्रीक वाइव्रे यांनी फ्रान्सच्या कामगार कायद्याचे उल्लंघन करत सुट्टी न घेता आपली बेकरी सुरु ठेवली. पर्यटकांची वाढती गर्दी आणि मागणी पाहून सेड्रिक यांनी सुट्टी न घेण्याचा निर्णय घेतला. पण फ्रान्सच्या लेबर कोर्टाने कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत, त्याच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सेड्रिकच्या समर्थनार्थ अनेकजण रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यामते, अशा प्रकारच्या कायद्यामुळे लघु उद्योजकांना आपल्या व्यावसायात मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. काही जणांनी तर या कारवाईचा निषेध केला आहे.