दुबई : दुबईतील जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीजवळच्या अपूर्ण बांधकाम अवस्थेतील इमारतीला रविवारी भीषण आग लागली. या आगीत जीवितहानीचं वृत्त नाही. पण ही इमारत जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा टॉवरच्या बाजूलाच असल्याने पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.


भारतीय वेळेनुसार, ही आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास जगप्रसिद्ध बुर्ज खलिफाच्या जवळच असलेल्या फाऊंटेन व्यूज या इमारतीला आग लागली. या इमारतीचं बांधकाम दुबई मॉल आणि 2016 च्या पूर्व संध्येला आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या हॉटेल शेजारीच सुरु असल्याची माहिती आग विझवणाऱ्या अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आज आग लागलेल्या इमरतीत एकूण तीन टॉवर असून, या प्रत्येक टॉवरमध्ये जवळपास 60 सदनिका आहेत. या इमारतीचं बांधकाम 2018 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.


दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये दुबईमधील टोलेजंग इमारतींना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासाठी इमारतींमध्ये कोटिंगचे जे पदार्थ वापरले जातात, ते ज्वालाग्राही असल्यानं ही आग रौद्र रुप धारण करत असल्याचं बोललं जात आहे.

2016 च्या पूर्वसंध्येला दुबईमधील अतिशबाजीवेळी लक्झरी डाऊनटाऊन हॉटेलला आग लागली होती. यानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. यामुळे जवळपास 16 लोक जखमी झाले होते.