वॉशिंग्टन : एकीकडे अमेरिकेने सीरियातील आयसीस विरोधात युद्ध पुकारलं आहे, तर दुसरीकडे याच अमेरिकेची गुप्तहेर संघटनेच्या FBI एका महिला कर्मचारीने आयसीसच्या दहशतवाद्याशी लग्न केल्याचं समोर आलं आहे. ही महिला FBI साठी अनुवादिकेचं काम करत होती. तिच्याकडे आयसीससाठी तरुण भरती करणाऱ्या दहशतवाद्याच्या हालचालींवर नजर ठेवाण्याची जबाबदारी होती. पण तिने त्याच दहशतवाद्याशी आपलं सूत जळवल्याचं उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, डेनियल ग्रीन नावाच्या या महिलला FBI ने जानेवारी 2014 मध्ये सीरियात पाठवलं होतं. तिच्याकडे आयसीससाठी तरुणांची भरती करणारा जर्मन दहशतवादी डेनिस कसपर्टच्या हलचालींवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपावली होती. ग्रीनला जर्मन भाषा अवगत असल्याने, तिची या कामगिरीवर नेमणूक करण्यात आली होती. पण ग्रीनने सहा महिन्यातच डेनिसशी सूत जुळवून लग्न केलं आहे.

अमेरिकेच्या एका न्यायाधीशाने या प्रकरणी गुप्तता पाळण्याचे आदेश दिले होते. पण नुकत्याच फेडरल कोर्टाच्या नोंदी सार्वजनिक झाल्याने हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

ग्रीन ही मुळची झेकोस्लावाकियाची रहिवाशी असून, तिने आपल्या लग्नासंबंधीची माहिती गुप्त ठेवली होती. विशेष म्हणजे, तिने FBI च्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी जर्मनीला जात असल्याचे सांगून, आयसीसच्या एका हस्तकाच्या मदतीने ती तुर्कस्थान मार्गे सीरियात जात असे.

डेनिसशी लग्न होण्यापूर्वी देखील ग्रीनचं आधी एक लग्न झालं होतं. पण आपल्या अमेरिकेच्या नोकरशाह पतीला घटस्फोट देण्यापूर्वीच तिनं डेनिसशी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर ग्रीनला आपली चूक लक्षात आली. यानंतर आपल्या एका जवळच्या व्यक्तीला पत्र लिहून याबाबतची हकीकत सांगितली.

यानंतर ती आयसीसच्या तावडीतून सुटल्यानंतर अमेरिकेत आली. तिच्याविरोधात न्यायालयीन सुनावणी झाल्यानंतर तिला दोन वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.