मुंबई : तुमच्या खिशातला पैसा (Currency), नोटा आणि बँक कार्ड्स भविष्यात कदाचित काहीही कामाचे राहणार नाहीत अशी धक्कादायक भविष्यवाणी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कने (Elon Musk Prediction) केली आहे. एआय (AI) आणि रोबोटिक्स झपाट्याने विकसित झाल्यास ‘पैसा’ हे फक्त औपचारिक साधन राहील, असे मस्कने एका पॉडकास्टमध्ये सांगितले.
इलॉन मस्कच्या मते, जेव्हा मशीनच सर्व गरजा विनामूल्य किंवा अतिशय स्वस्तात पूर्ण करू लागतील, तेव्हा सध्याची चलनव्यवस्था आणि पैशाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात कमी होईल.
पैसा का होईल बेकार? (Why Money Will Lose Value)
इलॉन मस्क अलीकडे ‘पीपल बाय WTF’ या निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. भविष्यात पैसा कसा असेल या प्रश्नावर तो म्हणाला की, AI आणि रोबोटिक्स इतक्या वेगाने प्रगत होतील की उत्पादनासाठी मानवशक्ती किंवा मोठ्या संसाधनांची गरजच उरणार नाही. वस्तूंची मुबलकता वाढली तर ‘पैसा’ या संकल्पनेचीच किंमत उरेलच असे नाही.
ऊर्जा - भविष्यातील करंसी (Energy Could Be Future Currency)
मस्कच्या मते, भविष्यात ऊर्जा (Energy Currency) हीच खरी करंसी ठरू शकते. ऊर्जा ही उत्पादनाची मूळ ताकद असल्याने, तिचे महत्त्व पैशापेक्षा जास्त होईल. त्याने बिटकॉइनचा विशेष उल्लेख करत सांगितले की त्यामागील मॉडेल हे ‘एनर्जी-बेस्ड’ आहे.
पोस्ट-स्कार्सिटी इकॉनॉमी काय? (Post-Scarcity Economy)
मस्कने स्कॉटिश लेखक इयान बँक यांच्या ‘कल्चर’ सीरिजचा दाखला दिला. त्यात एका अशा समाजाचे वर्णन केले आहे जिथे काहीच कमी नसते आणि पैसा अस्तित्वातही राहत नाही. सोलर-पावर्ड AI आणि स्पेसमधून ऊर्जा मिळवणाऱ्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात अशी दुनिया वास्तवात उतरण्याची शक्यता मस्कने व्यक्त केली.
भविष्यात नोकरी ऑप्शनल होणार? (Jobs Will Become Optional)
मस्कने आणखी एक मोठी भविष्यवाणी केली आणि ती म्हणजे पुढील 10 ते 20 वर्षांत काम करणे पूर्णपणे ‘ऑप्शनल’ होणार आहे. AI आणि रोबोटिक्स इतकी प्रगत होतील की जगातील बहुतेक कामे मशीन करतील. लोक इच्छा असेल तरच काम करतील असं तो म्हणाला.
मानवजातीचे भविष्य, पैसा आणि कामाबाबत मस्कने केलेल्या या भाकितांमुळे जगभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
ही बातमी वाचा: