मुंबई : फेसबुकचा सहसंस्थापक मार्क झुकरबर्गला मागे टाकून इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे सहसंस्थापक आणि सीईओ इलॉन मस्क हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मस्क यांची संपत्ती वाढून 1115.4 अब्ज डॉलर झाली आहे, तर मार्क झुकरबर्गची संपत्ती 110.8 अब्ज डॉलर आहे. शेअर्सच्या फॉरवर्ड स्टॉक स्पिल्टनंतर टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे, परिणामी इलॉन मस्क यांची संपत्ती वाढली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सने ही यादी आणि आकडेवारी जारी केली आहे.


टेस्ला कारच्या विक्रीत 500 टक्के वाढ झाली आहे. या हिशेबाने इलॉन मस्क यांच्या संपत्तीत 87.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. टेस्लाचं बाजारमूल्य 464 अब्ज डॉलर झालं आहे, जे वॉलमार्टच्या बाजारमूल्यापेक्षा जास्त आहे. महसुलाच्या बाबतीत वॉलमार्ट ही अमेरिकेतील सर्वात मोठी कंपनी आहे.


दरम्यान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यापासून इलॉन मस्क अजून फारच दूर आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांची संपत्ती इलॉन मस्कपेक्षा 200 अब्ज डॉलरने जास्त आहे.


जेफ बेजोसची घटस्फोटित पत्नी जगातील सर्वात श्रीमंत महिला
मस्क यांच्याशिवाय जेफ बेजोस यांची घटस्फोटित पत्नी मॅकेन्जी स्कॉट ही जगातील सर्वात श्रीमंत महिला बनली आहे. तिने लॉरिअलची वारसदार फ्रँकोई बेटनकोर्ट मेअर्सला मागे टाकलं आहे. स्कॉटला जेफ बेजोसच्या अॅमेझॉन डॉट कॉम मधील 4 टक्के वाटा मिळाला आहे. बेजोससोबत घटस्फोटाच्या वेळी तिला ही संपत्ती मिळाली. स्कॉटची 4 टक्के भागीदारी ही 66.4 अब्ज डॉलर एवढी आहे.


मुकेश अंबानी आठव्या स्थानावर
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आठव्या क्रमांकावर घसरले आहेत. मुकेश अंबानी यांची संपत्ती 79.8 बिलियन डॉलर आहे. खरंतर मुकेश अंबानी याआधी चौथ्या क्रमांवर पोहोचले होते. 28 जुलै रोजी मुकेश अंबानी यांची संपत्ती 81.9 बिलियन डॉलर झाली होती. ही आतापर्यंतची त्यांची सर्वाधिक संपत्ती होती.


मंदीच्या काळात श्रीमंतांच्या वाढत्या संपत्तीवर वाढता वाद
जगभरात कोविड-19 मुळे मंदीची मोठी लाट आली असताना, अॅलन मस्क, जेफ बेजोस यांसारख्या श्रीमंतांच्या संपत्तीतील वाढ हा वादाचा विषय बनला आहे. जगभरात कोट्यवधी जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. संपूर्ण जगात असमानता वाढत आहे. मागील काही दिवसांत अमेरिकेत्या सीनेटर बर्नी सँडर्स यांनी कोरोनाव्हायरसच्या संकटात अतिशय श्रीमंत व्यक्तींवर 'एक्स्ट्रीम वेल्थ टॅक्स' लावण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला मोठा पाठिंबा मिळाला होता.