कैरो : सुप्रसिद्ध वाहिनी अल-जझिराच्या दोन कर्मचाऱ्यांसह सहा जणांना इजिप्तच्या कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत महत्त्वाची कागदपत्र कतार आणि दोहातील टीव्ही समुहाला दिल्याने देहदंड ठोठावण्यात आला.

 
मोहम्मद मोर्सी अध्यक्षपदी असताना ही घटना घडल्याची माहिती आहे. मोर्सी आणि त्यांच्या दोन साथीदारांना 25 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला होता. तर सरकारी कागदपत्रं लीक केल्याने मोर्सी आणि त्यांच्या सचिवाला अतिरिक्त 15 वर्षांची जेल झाली.

 
न्यूज प्रोड्युसर अला ओमर मोहम्मद आणि संपादक इब्राहिम मोहम्मद हिलाल यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. अल जझिराकडून न्यायालयाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधातील हा निर्दयी निकाल असल्याचं म्हटलं आहे. वाहिनीतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांवरील अन्याय मांडण्यात आला आहे.