बिजींग : दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात तंत्रज्ञानाद्वारे पाऊस पाडण्यासाठी चीनने मदतीचा हात देऊ केला आहे. कृत्रिम पावसाचं तंत्रज्ञान 'क्लाऊड सीडिंग' उपलब्ध करुन देणं, तसंच हवामान विभागातील कर्मचाऱ्यांना त्याबाबतचं प्रशिक्षण देण्याची ऑफर चीनने महाराष्ट्र सरकारला दिली आहे.
जर महाराष्ट्राने होकार दिला, तर 2017 मध्ये मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो.
नुकतंच चीनमधील अधिकारी आणि वैज्ञानिकांच्या एका पथकाने महाराष्ट्र दौरा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अधिकाऱ्यांमध्ये कृत्रिम पावसाबाबत चर्चा झाली.
दुष्काळी महाराष्ट्रासाठी चीन काय मदत करु शकतो, असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या चीनच्या अधिकाऱ्यांना विचारला होता.
कृत्रिम पावसात चीनचा हातखंडा
कृत्रिम पाऊस पाडण्यामध्ये चीनचा हातखंडा आहे. अनेक वर्षांपासून चीनमध्ये क्लाऊड सीडिंग रॉकेट्सच्या आधारे कृत्रिम पाऊस पाडला जातो. पाऊस पाडण्यासाठी ढगांची गरज असते. या ढगांवर मारा केल्यानंतर कृत्रिम पाऊस पडतो.
चीन 1958 पासून क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानापैकी एक असं हे तंत्रज्ञान चीनकडे आहे.
चर्चेनंतर निर्णय
कृत्रिम पावसाबाबत सध्या चीन आणि भारत सरकारमध्ये चर्चा सुरु आहे. जर ही चर्चा सकारात्मक झाली, तर चीनी तज्ज्ञ भारतीय हवामान विभागातील अधिकाऱ्यांना आधुनिक क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देईल.
ही चर्चा यशस्वी झाल्यास, मराठवाड्यात 2017 मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊ, असं चीनने म्हटलं आहे.