कराकस : भाषण चालू असताना व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्यावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. शनिवारी झालेल्या या घटनेत निकोलस मादुरो थोडक्यात बचावले. लाईव्ह भाषणात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आणि सर्वांची पळापळ सुरु झाली.

व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे आपल्या लष्कराच्या शेकडो शिपायांसमोर भाषण करत असताना राष्ट्रपतींवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र, निकोलस मादुरो हे या हल्ल्यातून बचावले असून ते सुरक्षित आहेत, पण सात सुरक्षारक्षक या घटनेत जखमी झाले.

ड्रोनमध्ये स्फोटकं भरुन राष्ट्रपतींना लक्ष्य करण्याच्या दृष्टीनेच हा हल्ला करण्यात आला होता, पण फायर फायटर्सने हा प्रयत्न हाणून पाडला. पण या हल्ल्यामुळे कार्यक्रमाच्या आसपास असलेल्या नागरिकांच्या घराच्या काचाही फुटल्या. हा हल्ला नेमका कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही, मात्र राष्ट्रपतींवर हल्ल्यासाठी विरोधी पक्षांच्या आंदोलकांवर सरकारकडून आरोप केले जात आहेत.


व्हेनेझुएलाचे सूचना मंत्री जॉर्ज रोड्रिग्स यांनी या घटनेनंतर तातडीने प्रतिक्रिया दिली.

चॅनल NTN24 TV ने या घटनेचा व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये भाषणादरम्यान राष्ट्रपती आणि त्यांची पत्नी अचानक आकाशाकडे पाहू लागतात, आणि त्यानंतर स्फोटांचा आवाज ऐकायला येतो. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.