सॅन फ्रॅन्सिस्को : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होत असतानाच मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या अडचणी आणखी वाढत असल्याचं दिसत आहे. (US Capitol) घटनेप्रकरणी जागतिक राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली असतानाच आता त्यांच्या सोशल मीडिया वापरावरही निर्बंध आणण्यात आले आहेत. (Facebook) फेसबुक आणि इन्स्टाग्राममागोमाग आता ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरही कायमस्वरुपी बंदी आणण्यात आली आहे.


युएस कॅपिटलवर ट्रम्प समर्थकांकडून करण्यात आलेल्या अभुतपूर्व गोंधळ आणि त्यानंतर झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमुळं अशाच प्रकारची कोणतीही घटना भविष्यात घडू नये, यासाठी पुढील काळाबाबतची सावधगिरी म्हणून त्यांच्या ट्विटर (Twitter) अकाऊंटवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी ट्विटरकडून हा निर्णय़ घेण्यात आला.


'@realDonaldTrump' या ट्विटर अकाऊंटवरील ट्विटचं जवळून निरीक्षण केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्विटरकरडून ब्लॉग पोस्टमध्ये सांगण्यात आलं. यावेळी भविष्यात भडकावू ट्विटमुळं अशा प्रकारची कोणतीही हिंसक घटना घडू नये, यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कारण देण्यात आलं.


Corona Updates | कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर; लंडनमध्ये Major Incident ची मोठी घोषणा


युएस कॅपिटलम्ये झालेल्या निराशाजनक घटनेनंतर लगेचच प्राथमिक स्वरुपात 12 तासांसाठी ट्रम्प याचं ट्विटर अकाऊंट निलंबित केलं होतं. शिवाय भडकावू ट्विट करण्याचं सत्र असंच सुरु राहिल्यास अकाऊंवर कायमस्वरूपी बंदीची कारवाई केली जाऊ शकते, अशी ताकिदही त्यांना ट्विटरकडून देण्यात आली होती. अखेरच याचीच अंमलबजावणी आता करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.


दरम्यान, गुरुवारी ट्रम्प यांनी तात्पुरत्या बंदीच्या कारवाईनंतर ट्विटरवर पुनरागमन केलं होतं. इथं त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. पुढं त्यांनी आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कालावधी संपुष्टात येत असल्याची बाब अधोरेखितही केली होती. शिवाय शांततापूर्ण सत्तांतराकडेही त्यांनी लक्ष वेधलं. पण, जो बायडन यांच्या नव्या कारकिर्दीसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या नसून, शपथविधीसाठी जाणार नसल्याचेही स्पष्ट संकेत दिले.


दरम्यान, ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी निलंबित करण्यात आल्याची ही मोठी कारवाई ट्रम्प यांच्यावर करण्यात आल्यामुळं आता यापुढं ते नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.