मुंबई: अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना आपल्याकडे वळवण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचा आधार घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वापरलेला 'अबकी बार'च्या नाऱ्याचा वापर केला आहे.


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी 8 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत ट्रम्प यांनी एका जाहिरातीद्वारे सर्व भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींच्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपने वापरलेल्या 'अबकी बार, मोदी सरकार'च्या नाऱ्याचा आधार घेत, 'अबकी बार ट्रम्प सरकार' हा नारा दिला आहे.

दरम्यान, या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारात लढत होत आहे. या निवडणुकीसाठी झालेल्या प्रेसिडेन्शिअल डिबेटमध्ये ट्रम्प यांना हिलेरी क्लिंटन यांच्याकडून सपाटून मार खावी लागली. पण दुसरीकडे ट्रम्प यांनी मात्र, अमेरिकेत वसलेल्या भारतीयांना आपल्याकडे वळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले.

याचाच भाग म्हणून न्यूजर्सीमध्ये रिपब्लिकन हिंदू कोलिशनने एका चॅरिटी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये सहभागी झालेल्या ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींची मुक्तकंठाने स्तुती केली होती. तसेच आपण निवडून आलो, तर नरेंद्र मोदींसारखी धोरणं अमेरिकेत लागू करु, अशी घोषणाही त्यांनी केली होती.

व्हिडिओ पाहा