Raids On Donald Trump's House : अमेरिकचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या घरावर FBI कडून छापेमारी करण्यात आल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा (Florida) 'मार-ए-लागो' (Mar-A-Lago) या निवासस्थानी अमेरिकन केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे FBI ने छापेमारी केल्याची माहिती सोमवारी दिली आहे. दरम्यान, याबाबत FBI कडून या छापेमारीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा सोशल मीडिया अ‍ॅप ट्रुथ सोशल नेटवर्कवर (Truth Social Network) यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. 


'मला फसवण्यासाठी ही विरोधकांची खेळी'


ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'अमेरिकेसाठी काळा दिवस आहे. कारण माझ्या फ्लोरिडा येथील पाम बीचवरील 'मार-ए-लागो' या घरी एफबीआयच्या पथकाने छापेमारी केली आहे. हा लोकशाहीवर हल्ला आहे. सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर होत आहे. मी 2024 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शर्यतीत उभं राहू नये म्हणून मला फसवण्यासाठी ही विरोधकांची खेळी आहे.'






ट्रम्प केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर 


डोनाल्ड ट्रम्प सध्या अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहे. जानेवारी महिन्यात ट्रम्प समर्थकांनी व्हाईट हाऊसवर हल्ला केला होता. या हल्ल्याच्य पार्श्वभूमीवर एफबीआयकडून तपास सुरु आहे. यामुळे ट्रम्प आणि ट्रम्प समर्थक तपास यंत्रणाच्या केंद्रस्थानी आहेत. दरम्यान, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर व्हाईट हाऊस सोडताना ट्म्प यांनी अनेक सरकारी कागदपत्रसोबत नेले होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडताना कागदपत्रांनी भरलेले 15 बॉक्स आपल्या सोबत नेले. ही कागदपत्रं फ्लोरिडामधील मार-ए-लागो रिसॉर्टमधून हस्तगत करण्यात आली होता. त्यानंतर आता पुन्हा येथे छापेमारी करण्यात आली आहे.  


ट्रम्प यांना 2024 मध्ये विजयाची आशा 


डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024 च्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत विजयाची आशा आहे. ट्रम्प यांनी 2024 च्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी अद्याप अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. पण ट्रम्प त्यांनी गेल्या काही महिन्यांत यासाठी संकेत दिले आहेत. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना सध्या 40 टक्क्यांहून कमी जनतेचं समर्थन आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅट्स काँग्रेसचा पराभव होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2024 च्या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा डोनाल्ड ट्रम्प यांनी विश्वास आहे.