वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची मैत्री सर्वश्रूत आहे. पण ट्रम्प यांनी एका कार्यक्रमात चक्क पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याचं वृत्त आहे. अमेरिकेच्या 'वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्राने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त प्रकाशित केलं आहे.


'वॉशिंग्टन पोस्ट'च्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाने अफगाणिस्तानमध्ये आणखी एक हजार सैनिकांची तुकडी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, यापूर्वी बराक ओबामांनी आपल्या कार्यकाळात अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेण्याच्या दिशेने हालचाली सुरु केल्या होत्या. पण ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे आफगाणिस्तानात अमेरिकन सौनिकांची संख्या 14 हजारपर्यंत पोहोचली आहे.

यावरुनच पंतप्रधान मोदींनी आपल्या गेल्या वर्षातील अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान मोदी म्हणाले होते की, “कोणताही फायदा नसताना अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी जे योगदान दिले, ते अन्य कोणत्याही देशाने दिलेले नाही”

मोदींच्या याच विधानाचा उल्लेख ट्रम्प यांनी आपल्या एका भाषणादरम्यान केला. विशेष म्हणजे, याबाबत विधान करताना ट्रम्प यांनी मोदींच्याच शैलीत आणि हुबेहुब आवाज काढल्याचं या बैठकीला उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, या प्रकरणावरुन व्हाईट हाऊसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार कृष्णमूर्ती यांनी याचा निषेध व्यक्त केला आहे.