Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, त्यांना मंगळवारी अटक केली जाऊ शकते. त्यांनी आपल्या समर्थकांना याचा विरोध करण्यास सांगितले आहे. ट्रम्प म्हणाले की, मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयाकडून त्यांना अटक केली जाईल, अशी गुप्तचर माहिती मिळाली आहे. मात्र काय आरोप असतील हे त्यांनी सांगितले नाही. अॅटर्नी कार्यालयाच्या प्रवक्त्याने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, न्यूयॉर्कच्या काही सरकारी संस्था महिलांना दिलेल्या पैशांशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहेत. याप्रकरणी त्यांना अटक होऊ शकते. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांना शारीरिक संबंधांच्या बदल्यात पैसे देऊन हे प्रकरण सार्वजनिक करू नका, असे सांगितले होते, असा आरोप आहे. ट्रम्प यांनी शनिवारी पहाटे त्यांच्या सोशल नेटवर्क Truth Social वर एका पोस्टमध्ये सांगितले की, ''मॅनहॅटन अॅटर्नी कार्यालयातून बेकायदेशीरपणे लीक झालेल्या एका गुप्त माहितीनुसार त्यांना पुढील आठवड्यात मंगळवारी अटक केली जाईल."
ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना निषेध करण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांना अटके अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यूयॉर्कमधील कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी सुरक्षेची तयारी करत आहेत.
Donald Trump: काय आहे प्रकरण?
हे प्रकरण पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियलशी संबंधित आहे. तिचे खरे नाव स्टेफनी क्लिफर्ड आहे. तिचे म्हणणे आहे की, तिचे ट्रम्प यांच्यासोबत 10 वर्षांपूर्वी अफेअर होते. मात्र ट्रम्प यांनी असं काही नसल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी स्टॉर्मीला तिचे आणि त्यांचे लैंगिक संबंधांबद्दल मौन बाळगण्यासाठी 1.30 लाख डॉलर्स दिले होते, असा आरोप आहे. याच प्रकरणी आता चौकशी केली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा फेसबुक आणि यूट्यूबवर कमबॅक
दरम्यान, मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेसबुक आणि यूट्यूबवरही कमबॅक केला आहे. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परतल्यानंतर ट्रम्प यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प लिहिले की, I'M BACK! (मी परत आलो). फेसबुक आणि इंस्टाग्राम ऑपरेट करणारी कंपनी मेटा 25 जानेवारी 2023 रोजीच घोषणा केली होती की, ती ट्रम्प यांचे सोशल मीडिया अकाउंट रीस्टार्ट करणार आहे. या घोषणेसह कंपनीने असेही म्हटले आहे की, लोकांना राजकारण्यांचे ऐकण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. परंतु जर ट्रम्प यांनी यापुढे कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई केली जाईल.