Israel Iran War : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. G7 देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की इराणची स्थिती आता कमकुवत झाली असून तो शरणागतीच्या उंबरठ्यावर पोहोचल्यासारखा दिसतोय. अमेरिकन माध्यमांच्या अहवालांनुसार, ट्रम्प यांनी युद्धाचा निकाल आता स्पष्ट दिसत असल्याचंही म्हटलं आहे. मात्र या दाव्यावर व्हाइट हाऊसकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Continues below advertisement

G7 Virtual Meeting : G7 बैठकीत ट्रम्प यांचं वक्तव्य

G7 देशांच्या नेत्यांसोबत बुधवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीत ट्रम्प म्हणाले की, जगासाठी धोका ठरणारा कॅन्सरसारखा घटक आपण संपवला आहे. या वेळी त्यांनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी' या लष्करी मोहिमेचाही उल्लेख केला. मीडिया अहवालांनुसार, ट्रम्प यांनी असंही म्हटलं की सध्या इराणमध्ये स्पष्ट नेतृत्व दिसत नाही, त्यामुळे अधिकृतपणे शरणागती जाहीर करणारा नेता तिथं नाही.

Middle East War : युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची टीका

पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाला जवळपास दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. या काळात दोन्ही बाजूंनी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वावर तीव्र टीका करत त्यांना 'वेडे गुन्हेगार' असं संबोधलं. अशा नेत्यांचा अंत करणं हा सन्मानाचा विषय असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Continues below advertisement

गुप्तचर संस्थेचा अहवाल वेगळाच

एकीकडे इराण शरण येणार असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प हे करत असले तरी दुसरीकडे त्यांच्याच देशाच्या गुप्तचर संस्थेचा अहवाह मात्र वेगळंच सागतोय. सतत युद्धाची भाषा करणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचाच दावा महाग पडला आहे. इराणचं कट्टरतावादी सरकार हटवण्यासाठीच इराणवर हल्ला चढवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार इराणमधील सत्ताधारी नेतृत्व अजूनही स्थिर असून सरकार कोसळ्याची कोणतीही शक्यता नाही.

ट्रम्प आता युद्ध संपवण्याची भाषा करत आहेत, मात्र इराणमधील कट्टर नेतृत्व सत्तेत कायम राहिल्यास युद्ध संपवण्याचा मार्ग कठीण असल्याचंही गुप्तचर यंत्रणेनं म्हटलं आहे. 28 फेब्रुवारीला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामनेंचा मृत्यू झाल्यानंतही त्या देशातील एकजूट कायम असल्याचंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, या अहवालाबाबत व्हाईट हाऊसकडूनही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

ही बातमी वाचा: