पॅरिस : हवाई दल दिनाच्या दिवशी आज बहुप्रतिक्षित राफेल लढाऊ विमान फ्रान्सने भारताला सोपवलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वत: पहिल्या राफेल विमानाची पूजा केली. राजनाथ सिंह यांनी विमानावर ओम काढून, नारळ, फूल वाहून पूजा केली.


भारतीय हवाई दलासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारत आणि फ्रान्सचे संबध यानिमित्त मजबूत होत आहेत. राफेल विमान मिळाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी या विमानातून उड्डाणही केलं.





राफेल विमान भारताच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर भारताची ताकद आणखी वाढणार आहे. भारत आणि फ्रान्समध्ये 2016 मध्ये 36 राफेल विमानांचा करार झाला होता. 2022 पर्यंत सर्व विमान भारताला मिळणार आहेत.



राफेल हे दोन इंजिन असलेलं लढाऊ विमान आहे, ज्याची निर्मिती दसॉल्ट नावाच्या एका फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. यात मिटिऑर आणि स्काल्प ही दोन क्षेपणास्त्र आहेत, ज्यामुळे ते भारताला हवेतून हवेत मारा करण्याची अद्भुत क्षमता देईल. ही दोन्ही क्षेपणास्त्र राफेलचा यूएसपी आहे, असं म्हणता येईल.





राफेल लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये


1. राफेल असं लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. भारतीय वायूसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेत होती.


2. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.


3. राफेल विमान हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं.


4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.


5. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.


6. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.


7. राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.


8. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.