Daughter's Day 2023: आज जागतिक कन्या दिवस (International Daughter's Day). प्रत्येक आई-वडिलांसाठी तसेच मुलींसाठी (Girls) आजचा दिवस खास आहे. मुलगी म्हणजे जिच्याशिवाय भविष्याचं स्वप्न पाहणं व्यर्थ आहे, त्यामुळेच भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कन्या दिन साजरा केला जातो. दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा चौथा रविवार हा कन्या दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी कन्या दिन (Daughter's Day 2023) 24 सप्टेंबर 2023 रोजी आहे.
मुलींच्या हक्कांसाठी आवाज उठवणं आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं हे 'कन्या दिवस' साजरा करण्यामागचं कारण आहे. 2007 पासून ही दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. पण हिंदू धर्मात मुलींचं महत्त्व काय? ते जाणून घेऊया.
हिंदू धर्मात मुलींचं महत्त्व (Daughter Importance in Hinduism)
मुलगी ही निसर्गाने दिलेली एक सुंदर भेट आहे. ज्याच्या घरात मुलगी जन्माला येते ते खरंच खूप भाग्यवान असतात, असं मानलं जातं. कारण भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मात मुलीला देवीचं, लक्ष्मीचं रूप मानलं जातं. धर्मग्रंथात असंही सांगितलं आहे की, सद्गुणी व्यक्तीच्या घरीच कन्या जन्माला येते, कारण अधर्मी लोकांच्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही.
हिंदू धर्मात मुलींची होते पूजा
हिंदू धर्मात मुलीला केवळ देवी म्हटलं जात नाही, तर देवीसमान मुलीची पूजाही केली जाते. त्यामुळे हिंदू धर्मात कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे. नवरात्री, व्रत उद्यापन आणि इतर अनेक प्रसंगी मुलींची पूजा केली जाते.
मुलींच्या पूजेबाबत धर्मग्रंथात असं म्हटलं आहे की, एका मुलीची पूजा केल्याने समृद्धी मिळते. दोन मुलींची पूजा केल्याने सुख आणि मोक्ष प्राप्त होतो. तीन मुलींची पूजा केल्याने धर्म, धन आणि काम मिळतं. चार मुलींची पूजा केल्याने राज्यपद मिळतं. पाच मुलींची पूजा केल्याने विद्येची, ज्ञानाची प्राप्ती होते. सहा मुलींची पूजा केल्याने सहा प्रकारची सिद्धी प्राप्त होते. सात मुलींच्या पूजेने राज्य मिळतं. आठ मुलींच्या पूजेने धन प्राप्ती होते. नऊ मुलींच्या पूजेने पृथ्वीकडून प्रभुत्व प्राप्त होतं.
मुलींमध्ये असतात देवीसारखे गुण
- घरातील कन्या ही लक्ष्मीसारखी कोमल आणि प्रेमळ असू शकते, जी घरात संपत्ती आणि समृद्धी आणते.
- मुलगी सीतेसारखी हुशार, धैर्यवान आणि विश्वासू असू शकते.
- मुली राधेसारख्या असू शकतात, त्या राधेसारखं अमर्याद प्रेम देऊ शकतात.
- मुलगी रुक्मिणीसारखी सुंदर आणि नम्र असू शकते.
- मुलगी दुर्गा मातेसारखी असू शकते, जी स्त्रीत्वाचं प्रतिनिधित्व करते.
- दुष्कृत्यांचा नाश करण्यासाठी कन्या महाकालीही होऊ शकते.
मुलगी ही निसर्गाने दिलेली अशी एक भेट आहे, जी तिच्या साधेपणाने, आनंदाने, उत्साहाने घरात चैतन्य निर्माण करते. मुली कर्तृत्ववान असतात, खंबीर असतात, स्वाभिमानी असतात. आज प्रत्येक क्षेत्रात मुलींनी मुलांच्या बरोबरीने समाजात आपलं स्थान निर्माण केलं आहे.
हेही वाचा: