न्यूजर्सी/ अमेरिका : लग्न म्हणजे प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा क्षण. ज्यांचे लग्न असते, त्या मुलासाठी आणि मुलीसाठी तो दिवस खूप वेगळा आणि खास असतो. पण अमेरिकेच्या न्यूजर्सीत एक अनोखं लग्न पार पडलं. एका लग्नाळू जोडप्याला कोर्टातील महिलांच्या प्रसाधनगृहात लग्न आटपायला लागलं आहे.


ब्रायन आणि मारिया शूज हे दोघेही रजिस्टर पद्धतीने लग्नासाठी मॉनमाउथ काउंटी कार्ट हाऊसमध्ये आपल्या लग्नासाठी कुटुंबिय आणि आप्तेष्टांसोबत जमले होते. सगळं काही सुरळीत सुरु होतं. पण अचानक वराच्या आईला दम्याचा अटॅक आला. यानंतर तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनी वराच्या आईला महिलांच्या प्रसाधनगृहात नेऊन, तिथे तिला ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली. तसेच, पुढील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्ब्युलेंसलाही बोलावली.

पण वराच्या आईची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे सर्वांनाच त्यांची चिंता वाटू लागली. पण कुणालाही लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलू नये, असेच वाटत होते. कारण, लग्नाच्या पुढील तारखेसाठी सर्वांना 45 दिवस वाट पाहावी लागणार होती.

शिवाय, वराच्या आईची प्रकृती गंभीर झाल्यास, तिच्या अनुपस्थितीत लग्न करावे लागणार होते. त्यामुळे सर्वांनी यावर विचार करुन, वराच्या आईला ज्या ठिकाणी नेण्यात आले होतं, त्याच ठिकाणी दोघांचंही लग्न उरकण्याचे ठरवलं. याला वधू-वरांनीही होकार दिला.

विशेष म्हणजे, न्यायमूर्ती केटी गमर यांनीही सहकार्याची भूमिका घेत, लग्नाच्या कार्यवाहीसाठी महिलांच्या प्रसाधनगृहात उपस्थित झाल्या. अन्, त्यांचं रजिस्टर पद्धतीने लग्न लावण्यात आलं. यानंतर नवदाम्पत्यांनी कोर्टाच्या कर्मचारी वर्गाचे आभार मानले.