नवी दिल्ली : जगभरातील कोरोनाचे संक्रमण अद्याप म्हणावं तितकं नियंत्रणात आलं नाही. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माजलेला हाहाकार काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या लसीकरण हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. दरम्यान, अमेरिकेने सोमवारी एक महत्वाची घोषणा केली. अमेरिकेकडून जगभरातील देशांना 5.5 कोटी कोरोनाच्या लसी देण्यात येणार आहेत. त्यापैकी सर्वाधिक, म्हणजे 1.6 कोटी लसी या भारत आणि बांग्लादेशसारख्या आशियाई देशांना मिळणार आहेत.
एकूण आठ कोटी लसी देणार
या आधी अमेरिकेकडून अडीच कोटी लसींची मदत करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता त्यात 5.5 कोटी लसींची भर पडली असून ती एकूण आठ कोटींवर गेली आहे. अमेरिकेतील कोरोनाच्या लसीकरणाने एक महत्वाचा टप्पा गाठल्यानंतर अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ही घोषणा केली आहे. अमेरिकेसोबतच जगभरातील कोरोना संपवण्याच्या उद्देशाने आपण या लसी इतर देशांना उपलब्ध करुन देत असल्याचं बायडेन प्रशासनानं सांगितलं आहे.
व्हाईट हाऊसने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की, जगभरातील कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी अध्यक्ष बायडेन यांनी इतर देशांना लसी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत निर्मिती होणाऱ्या एकूण आठ कोटी लसींचे वितरण जगभरातील देशांना जूनच्या शेवटच्या अठवड्यापर्यंत करण्यात येणार आहे.
अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या या आठ कोटी लसींपैकी 75 टक्के लसी या कोवॅक्स कार्यक्रमाच्या अंतर्गत वितरित केल्या जाणार आहेत. उरलेल्या 25 टक्के लसी या ज्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे त्या देशांना देण्यात येणार आहेत. त्यामध्ये भारत, बांग्लादेश आणि इतर आशियाई देशांचा समावेश होतो.
महत्वाच्या बातम्या :
- Navi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच नाव देण्याच्या राज ठाकरेंच्या भूमिकेला कृती समितीचा विरोध
- कोरोना काळात परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेणारं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर राज्यातील पहिलं विद्यापीठ
- Happy Birthday Thalapathy Vijay : थलापती विजयच्या 'या' गोष्टी आपल्याला माहिती आहेत का?