Corona Vaccine : भारतात एकीकडे कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. लोकांची इच्छा असून देखील आणि पैसे देऊन देखील लस घ्यायला तयार आहेत, मात्र लस मिळत नाहीये अशी स्थिती सध्या देशात आहे. तर दुसरीकडे हाँगकाँगमध्ये लोकांना लस घेण्यासाठी विविध पद्धतीने प्रोत्साहित केले जात आहे. हाँगकाँगमध्ये लोकांना लसी देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी लॉटरी पद्धतीने फ्लॅट देण्यात येत आहे.
हाँगकाँगमध्ये कोरोनाची लस घेणार्या लोकांना बक्षीस म्हणून 14 लाख यूएस डॉलर्सचा फ्लॅटची ऑफर दिली जात आहे. कारण इथले बरेच लोक लसीकरणासाठी उत्सुक नाहीत. सिनो ग्रुपचे एनजी टेंग फोंग चॅरिटेबल फाऊंडेशन आणि चीनी इस्टेट होल्डिंग्ज लिमिटेड क्वान टोंग क्षेत्रात त्यांच्या ग्रँड सेंट्रल प्रकल्पात नवीन अपार्टमेंट्स देत आहेत. लसीचे दोन्ही डोस घेणारे हाँगकाँगचे रहिवासी 449 चौरस फूट (42 चौरस मीटर) अपार्टमेंटसाठीच्या ड्रॉसाठी पात्र ठरतील. सिनो ग्रुप हा हाँगकॉंगमधील लिस्टेड डेव्हलपर कॉर्पोरेशनची मूळ कंपनी आहे.
रोख प्रोत्साहन देण्याची सरकारचा नकार
हाँगकाँगमध्ये कोरोना लसीकरणासाठी हवी तशी नोंदणी होत नाहीये. त्यामुळे हाँगकाँग सरकार न वापरलेल्या कोरोना लसीचे डोस डोनेट करण्यासह अनेक पर्यायांचा अभ्यास करत आहे. कारण यापैकी काही लस ऑगस्टमध्ये एक्सपायर होणार आहेत. जगभरात लसीची वाढती मागणी वाढत आहे, मात्र लसीकरणाला चालना देण्यासाठी कोणत्याही रोख रक्कम किंवा इतर प्रकारच्या प्रोत्साहनांचा सरकारने इन्कार केला आहे.
केवळ 12.6 टक्के लोकांचं लसीकरण
हाँगकाँगच्या 75 लाख लोकांपैकी केवळ 12.6 टक्के लोकांचं संपूर्ण लसीकरण करण्यात आले आहे. तर हाँगकाँगचा शेजारी सिंगापूरमधील लोकसंख्येच्या 28.3 टक्के लोकांना लस देण्यात आली आहे. हाँगकाँगमध्ये विनामूल्य अपार्टमेंटची ऑफर आकर्षक असल्याचे निश्चित आहे, कारण येथे मालमत्तेचे दर खूप जास्त आहेत. न्यूयॉर्क, ओहियो, मॅरीलँड, केंटकी आणि ओरेगनमध्येह लोकांसाठी लकी ड्रॉ देण्यात येत आहेत.