एकीकडे भारतात रोज 35-40 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. परिस्थिती पूर्णत: नियंत्रित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंड या देशात केवळ एक रुग्ण आढळला म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


न्यूझीलंडमधील सर्वात मोठं शहर ऑकलँडमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी मंगळवारी तीन दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. मंगळवारी मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊन लागू होणार आहे. ऑकलँडमध्ये सात दिवस लॉकडाऊन सुरू राहणार आहे. जॅसिंडा आर्डर्न यांनी वेलिंग्टन येथे पत्रकार परिषदेत देशात लॉकडाऊनची घोषणा केली.


रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न म्हणाल्या की, ऑकलँड आणि आसपासच्या प्रदेशात सात दिवसांसाठी लॉकडाऊन लागू राहील. तर देशभरात तीन दिवसांचा लॉकडाऊन असेल. जॅसिंडा आर्डर्न पुढे म्हणाल्या की, नव्या रुग्णामध्ये कोरोनाचा नवीन डेल्टा प्रकार असल्याचे अधिकारी गृहीत धरत आहेत, मात्र याची पुष्टी झालेली नाही.


न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाच्या केसेसविषयी आणि त्याच्या प्रमाणात किंवा विलगतेशी काय संबंध आहे याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट नाही. या व्यक्तीला संसर्ग कसा झाला याची चौकशी केली जात आहे. न्यूझीलंडमधील कोरोनाचे शेवटचा रुग्ण फेब्रुवारीमध्ये आढळला होता.


न्यूजीलंडने कोरोनावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले आहे. म्हणूनच साथीच्या काळात त्याची अर्थव्यवस्था लवकर सावरली. मात्र न्यूझीलंडमध्ये कोरोना लसीकरणाची गती संथ आहे. त्यामुळे तेथील धोका देखील कायम आहे. 


अत्यंत वेगाने संक्रमण होणाऱ्या डेल्टा प्रकारामुळे आता देशात पुन्हा लॉकडाऊनची नामुष्की ओढावली आहे. लॉकडाऊन दरम्यान सर्व शाळा, सार्वजनिक ठिकाणे आणि बहुतेक व्यवसाय बंद राहतील. लोकांना घरून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बाहेर जाण्याची गरज असेल तेव्हा फेस मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


इतर बातम्या