Surveillance Balloon: अमेरिकेच्या (America) हवाई हद्दीत काही दिवसांपूर्वी चीनचा स्पाय बलून (China Spy Balloon) हेरगिरी करत असल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं (US Department of Defense) केला होता. तसेच, हेरगिरीच्या संशयामुळे अमेरिकेने क्षेपणास्त्र मारा करत चीनचा स्पाय बलून फोडला. आता अमेरिकेप्रमाणे भारतातही चीनची स्पाय बलूनद्वारे हेरगिरी सुरू असल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे. 'वॉशिंग्टन पोस्ट'मध्ये अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त प्रकाशित करण्यात आलं आहे. भारतातील लष्करी तळ आणि संवेदनशील ठिकाणांवर हेरगिरी केल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. 


अमेरिकन संरक्षण मंत्रालय, तसेच गुप्तचर सूत्रांच्या हवाल्यानं वॉशिंग्टन पोस्ट वर्तमानपत्रानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. चीननं केवळ अमेरिकाच नव्हे तर भारतातील महत्त्वाची लष्करी ठिकाणं आणि संवेदनशील स्थळांची माहिती घेण्यासाठी चीनेनं या बलूनचा वापर केला असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेनं चीनचा स्पाय बलून फोडल्यानंतर आता चीननं भारत, जपान इत्यादी देशांना लक्ष्य करून अनेक स्पाय बलून सोडल्याचा आणि या देशांची लष्करी माहिती गोळा केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. 


वॉशिंग्टन पोस्टनं आपल्या एका रिपोर्टमध्ये लिहिलंय की, "स्पाय बलूनद्वारे इतर देशांवर लक्ष ठेवण्याचं काम चीनच्या दक्षिण किनारपट्टीपासून दूर असलेल्या हैनान प्रांतातून चालवलं जातं. याद्वारे चीननं जपान, भारत, व्हिएतनाम, तैवान आणि फिलिपाइन्ससह इतर धोरणात्मक हितसंबंध असलेल्या अनेक देशांची आणि प्रदेशांची हेरगिरी केली आहे. चीन याद्वारे सर्व देशांची लष्करी माहिती गोळा करतोय." या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता, अमेरिकन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर अहवालात म्हटलंय की, हे स्पाय बलून चिनी सैन्य चालवतात आणि हे बलून आतापर्यंत पाच खंडांमध्ये पाहिले गेले आहेत.


अहवालात असं म्हटलंय की, अमेरिकेच्या उपपरराष्ट्र सचिव वेंडी शर्मन यांनी 40 दूतावासातील 150 अधिकाऱ्यांना चिनी स्पाय बलून फोडल्याची माहिती दिली, जेणेकरून ते त्यांच्या सहकाऱ्यांना संभाव्य धोक्याबद्दल सावध करू शकतील. अमेरिकन अधिकारीही अनेक देशांशी स्पाय बलूनशी संबंधित माहिती शेअर करत आहेत. ही माहिती खासकरून जपानसोबत शेअर करण्यात आली आहे, ज्यांच्या लष्करी क्षमतेला चीनकडून लक्ष्य केलं जात आहे. 


अमेरिकेनं फोडला चीनचा स्पाय बलून 


अमेरिकेच्या हवाई हद्दीत नुकताच काही दिवसांपूर्वी एक मोठा चिनी फुगा उडताना दिसला होता. चीन स्पाय बलूनद्वारे हेरगिरी करत असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. पण, चीनने हे आरोप फेटाळत हा फुगा फक्त हवामानासंदर्भात माहिती गोळा करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. पण, हेरगिरीच्या संशयामुळे अमेरिकेने क्षेपणास्त्र मारा करत चीनचा स्पाय बलून फोडला. यानंतर चीन मात्र भडकला. अमेरिकेला याचा मोठा फटका बसेल, अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे.


स्पाय बलून नेमकं आहे तरी काय? 


हेरगिरीसाठी स्पाय बलूनमध्ये अत्याधुनिक कॅमेरे बसवलेले असतात. एखाद्या क्षेत्राचा दीर्घकाळ अभ्यास करण्याची क्षमता या स्पाय बलून्समध्ये असते. जमिनीवरून ज्या क्षेत्राचे निरीक्षण करणे खूप कठीण आहे, त्या क्षेत्राचा अधिक अभ्यास करण्यासाठी याचा वापर केला जातो. स्पाय बलून जमिनीपासून जास्त उंचीवर उडू शकतात, म्हणून त्यांचा वापर हवामानाशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. तसेच, हेरगिरीसाठी हे बलून उपग्रहांपेक्षा (Satellite) सरस ठरतात. कारण ते उपग्रहांपेक्षा एखादं क्षेत्र अधिक सहजपणे आणि जास्त काळ स्कॅन करू शकतात.