'ग्लोबल टाईम्स' नावाच्या वृत्तपत्राने संपादकीय कॉलममधील ओपिनीयन या सदरात मोदी-ट्रम्प भेटी संदर्भातील लेख प्रकाशित केला आहे. यात शितयुद्धाचा उल्लेख करुन चिनी मीडियाने भारतावर चांगलीच आगपाखड केली आहे. "1960 च्या दशकाच्या सुरुवातील सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या दोन्ही देशांनी चीनवर आपलं वर्चस्व प्रस्थापिक करण्यासाठी भारताचा वापर करुन घेतला. यासाठीच अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी भारताच्या 'इंडिया फॉरवर्ड पॉलिसीला' समर्थन दिलं होतं. पण केनेडींना जे हवं होतं ते त्यांना साध्य करता आलं नाही.''
विशेष म्हणजे, या लेखातून 1962 च्या भारत-चीन युद्धातील भारताच्या पराभवाबद्दलही यातून आठवण करुण देण्यात आली आहे. भारताने चीनसोबत बरोबरी करण्यापूर्वी इतिहासातून काहीतरी शिकलं पाहिजे. तसेच भारताने अमेरिकेच्या खेळी ओळखून वेळीच सावध व्हायला पाहिजे. भारताने चीनसोबतचे संबंध सौहार्द्याचे राखण्याचेच त्यांच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी योग्य असल्याची, धमकी चीनी मीडियाने या लेखातून दिली आहे.
याशिवाय भारत-अमेरिका संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थान मिळवणे अशक्य असल्याचं यातून सांगितलं आहे. या लेखात म्हणलंय की, "बराक ओबामा यांच्या कार्यकाळात भारताला भुलवण्यासाठी अमेरिकेनं सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वाचं गाजर दाखवलं. पण यासाठी कोणतेही व्यवहारी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे भारताला सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व बहाल करण्यास ट्रम्प कितपत यशस्वी होतील?" असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
तसेच भारताने अमेरिकेसोबतचे संबंध बळकट करणं त्यांच्या हिताचं नसून, जर त्यासाठी भारताकडून प्रयत्न होत असल्यास, अशिया खंडातलं शांततेचं वातावरण बिघडू शकेल, असा इशाराच दिला आहे.