सिक्कीममधून भारताने सैन्य हटवावं, चीनच्या उलट्या बोंबा
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2017 10:16 AM (IST)
बीजिंग : भारत आणि चीनमधील संबंधांतला तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतानं सिक्कीमच्या डोंगलांगमधून सैन्य हटवावं, अन्यथा चीनी नागरिकांना भारतात जाऊ देणार नाही, असा इशारा चीनने दिला आहे. चीनच्या नागरिकांना भारतात जाण्यापासून मज्जाव घातला जाईल. तसंच सध्या भारतात असलेल्या चीनच्या नागरिकांनाही मायदेशी परत बोलवण्याचे आदेश दिले जातील, अशी धमकी चीनच्या परदेश मंत्रालने दिली आहे. कोणताही देश युद्ध पुकारण्यापूर्वी अशा प्रकारचा सूचना जारी करतो. त्यामुळे चीन युद्ध पुकारण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनचा दावा काय? 'चीन सिक्कीमजवळ रस्ता बांधत असल्याचं सांगून भारत जगाची दिशाभूल करत आहे. मात्र भारत आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करुन दुसऱ्या देशाच्या हद्दीत आपले सैनिक पाठवत आहे. भारताने 1954 चा पंचशील करार मोडला आहे. भारताला शांतता हवी असेल तर डोंगलांग भागातून त्याने सैन्य हटवावं. अन्यथा परिस्थिती बिकट होईल. भारतात असलेल्या चीनी नागरिकांसाठी आम्हाला सूचना जारी कराव्या लागतील.' असा दावा चीनने केला आहे.